मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचे मा. मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ

पनवेल: पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ आज दिनांक 5जानेवारी,2024 रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकुर, रविंद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी,  महेंद्र दळवी, डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे कुलगुरु प्रा.डॉ. कारभारी काळे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत लोणेरे, माणगाव येथे करण्यात आला. महाराष्ट्रात ही सुविधा राबविणारी ‘पनवेल महानगरपालिका’ ही पहिली  महानगरपालिका आहे.

व्यवसायपूरकता (इज ऑफ  डुंइंग बिझनेस) या उपक्रमांतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा (इंटिग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल) मार्फत एकात्मिक स्वरूपात सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ही नवीन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेअंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी- विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे  नोंद करताना महानगरपालिकेच्या कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता कर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करुन पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणीदस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे. यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही, तसेच मालमत्ताधारकांना आपले स्वत:चे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध  होणार आहे,  अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिली आहे.

 या सुविधेचा पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होणार आहे. सहाय्यक निबंधक पनवेल यांच्या कार्यालयामध्ये देखील या सुविधेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहे जेणे करून याबाबत मालमत्ताधारकांमध्ये याबाबत माहिती मिळेल. या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ते आज दिनांक 5 जानेवारी,2024 रोजी 236 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरल्यास मालमत्तांधारकांना दोन टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाहतुकदारांचा संप मिटताच भाजीपाला आवक मध्ये वाढ