घणसोली मध्ये ९० लाखांची वीजचोरी उघड

‘महावितरण'ची १७५ वीज चोरांविरुध्द कारवाई

नवी मुंबई : ‘महावितरण'च्या पथकाने घणसोलीमध्ये राबविलेल्या वीज चोरी शोध मोहिमेत तब्बल ९० लाख रुपयांची वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराची एकूण १७५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. ‘महावितरण'ने आता या सर्व वीज चोरांविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात केल्याने वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

घणसोली मध्ये वीजहानी जास्त असल्यामुळे वीज चोरीची मोहिम राबविण्याचा सूचना भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता, सिंहाजीराव गायकवाड यांनी मंडळ कार्यालय स्तरावर वाशी विभाग आणि नेरुळ विभागाच्या सहकार्याने गत आठवड्यात घणसोली मध्ये वीजचोरांविरुध्द मोहिम राबविली होती. या मोहिमेमध्ये ‘महावितरण'च्या पथकाने कलम १३५ अंतर्गत ७७ लाख रुपयांची १४६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. 

तसेच कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराची २६ प्रकरणे उघडकीस आणून ‘महावितरण'तर्फे त्याअंतर्गत सुमारे १२.९५ लाख रुपयांची दंडात्मक वीजबिल वसुली करण्यात आली आहेत. अशा प्रकारे ‘महावितरण'ने घणसोली मध्ये मोहिम राबवून एकूण ९० लाख रुपयांची वीजचोरी आणि अनधिकृत वापराची एकूण १७५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. 

या कारवाईदरम्यान ‘महावितरण'च्या वतीने पहल्यांदाच वीज चोरी केलेल्या ग्राहकांसाठी कंपाऊडींग करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून वीजचोरीचे बिल आणि कंपाऊडींग रक्कम न भरलेल्या ग्राहकावर वीज कायदा २००३, कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल जात आहेत. त्यानुसार घणसोली मधील उघडकीस आलेल्या १४६ प्रकरणातील १२९ ग्राहकांनी वीजचोरीचे वीजबिल अथवा कंपाऊडींग अथवा दोन्ही भरलेले नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द घणसोली शाखेचे सहाय्यक अभियंता सुनिल सरोदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. 

‘महावितरण'चे वाशी मंडळ अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली सदर वीज चोरी शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता (वाशी विभाग) मोहोड, अति. कार्यकारी अभियंता (ऐरोली उपविभाग) गोफणे, अति. कार्यकारी अभियंता (वाशी विभाग) कासल, सहा. अभियंता, सुनील सरोदे, नेरुळ विभागाचे बिरे तसेच वाशी विभागातील मोहिमेमध्ये भाग घेतलेले अभियंते आणि जनमित्र यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये महिला अभियंत्याचे काम देखील कौतुकास्पद आहे. 

वीजचोरी किड असून ती समुळ नष्ट करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी प्रामाणिकपणे वीज वापर करुन वीजबिल वेळेत भरावे. कोणत्याही वेगवेगळ्या युक्त्या वापरुन वीजचोरी केली तरी महावितरण कंपनी ती शोधून काढणारच. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजचोरी सारख्या समाजहितास आणि आत्मसन्मानास हानीकारक बाबी पासून दूर रहावे. वीजचोरी शोध मोहीम अशीच पुढे चालू राहणार आहे.  -सुनिल काकडे, मुख्य अभियंता-भांडूप परिमंडळ-महावितरण.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक'वर कारला २५० रुपये टोल