एपीएमसी भाजीपाला बाजारात हिरवा वाटाणा आवक मध्ये घट

दरात वाढ; घाऊक बाजारात ७०  ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने  विक्री

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये ‘हिरवा वाटाणा' आवकीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे घाऊक एपीएमसी भाजीपाला बाजारात वाटाणा दर वधारले असून, ७०  ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने हिरवा वाटाणा विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात ११० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने हिरवा वाटाणा विकला जात आहे. ३ जानेवारी रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात ४ वाहनातून २६१ क्विंटल वाटाणा आवक झाली.

एपीएमसी भाजीपाला बाजारात पुन्हा वाटाणा आवक घटल्याने दरात वाढ होत चालली आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होण्यास सुरुवात होत असते. डिसेंबरमध्ये हिरवा वाटाणा हंगाम सुरु होतो. तर वर्षभर तुरळक वाटाणा एपीएमसी भाजीपाला बाजारात दाखल होत असतो.

एपीएमसी भाजीपाला बाजारात मध्य प्रदेशातून हिरवा वाटाण्याची आवक होते. मात्र, सध्या एपीएमसी भाजीपाला बाजारात राज्यातील सातारा, नाशिक येथील वाटाणा दाखल होतो. परंतु, राज्यात हिरवा वाटाणा उत्पादन घटले आहे. दुसरीकडे परराज्यातील वाटाणा आवक देखील बंद आहे. दोन महिन्यांपूर्वी  घाऊक एपीएमसी भाजीपाला बाजारात हिरवा वाटाणा ४० रुपयांपर्यंत उतरला होता. मात्र, एपीएमसी भाजीपाला बाजारात आता पुन्हा हिरवा वाटाण्याची आवक २० ते २५ % घटली आहे. घाऊक भाजीपाला बाजारात हिरवा वाटाणा आता प्रतिकिलो  ७०ते ७५ रुपये दराने तर किरकोळ बाजारात  ११० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

दरम्यान, यापुढील कालावधीत देखील हिरवा वाटाणा आवक  आणखी कमी होणार असून, वाटाणा दरात वाढ होणार आहे, अशी माहिती एपीएमसी भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ येथील भूखंडाला प्रती चौ.मी. ६.४६ लाख रुपये दर प्राप्त