नेरुळ येथील भूखंडाला प्रती चौ.मी. ६.४६ लाख रुपये दर प्राप्त

१८ भूखंड विक्रीतून ११८० कोटी येणार

नवी मुंबई : सन २०२३ च्या वर्ष अखेरीस ‘सिडको'ने काढलेल्या भूखंड विक्री योजनेत १८ भूखंड विक्रीच्या माध्यमातून ‘सिडको'च्या तिजोरीत तब्बल ११८० कोटी रुपयांची भर पडणार आहे. तर या भूखंड विक्री योजनेतील अन्य १८ भूखंडांना एकाही विकासकाने बोली न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोली प्राप्त न झालेले बहुतांश भूखंड विशेष करून बंगलो प्लॉट साठी राखीव असून या भूखंडाचा बेस रेट जास्त असल्यामुळे त्यांना प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भूखंड विक्रीच्या आपल्या धोरणाबाबत ‘सिडको'ला पुनर्विचार करावा लागणार आहे.

भूखंड विक्रीस काढताना ‘सिडको'ने भूखंडाच्या बेस रेटची किंमत वाढविल्याने निविदा भरणाऱ्या विकासकांना भूखंडाच्या किमतीच्या १० टक्के इसारा अनामत रक्कम अर्थात ईएमडी भरावी लागते. सदर बाब विकासकांना अडचणीची ठरत आहे. ‘सिडको'च्या या भूखंड विक्री धोरणामुळे विकासकांचा प्रतिसाद लाभत नसल्याचे काही विकासकांचे म्हणणे आहे.

भूखंड विक्री योजना ३६ अंतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये ‘सिडको'ने नवी मुंबई क्षेत्रातील विविध नोड मधील ३६ भूखंड विक्रीस काढले होते. त्या भूखंड विक्री योजनेतील नेरुळ, सेक्टर-४ येथील भूखंड क्रमांक-२३ ला प्रति चौरस मीटर ६ लाख ४६ हजार रुपये दर प्राप्त झाला आहे. ‘सिडको'च्या ५३ वर्षाच्या इतिहासातील सदर सर्वाधिक विक्रमी दर प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हाच भूखंड ‘सिडको'ने मार्च २०२३ मध्ये भूखंड विक्री योजना ३३ अंतर्गत विक्रीस काढला होता. त्यावेळेस या भूखंडाला प्रति चौरस मीटर ६ लाख ७२ हजार रुपये दर प्राप्त झाला होता. परंतु, सदर दर भरणाऱ्या विकासकाने भूखंडाची रक्कम विहित वेळेत ‘सिडको'कडे न भरल्याने ‘सिडको'ने संबंधित विकासकाची इसारा अनामत रक्कम (ईएमडी) जप्त करुन सदर भूखंड पुन्हा विक्रीस काढल्याची माहिती सिडको सुत्रांनी दिली. त्यानुसार या भूखंडाला ६ लाख ४६ हजार रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला आहे.

महत्वाचे म्हणजे सदर भूखंड गेली कित्येक वर्षे नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता. वर्षभरापूर्वी सदर भूखंड ‘सिडको'ने ताब्यात घेऊन तो सर्वप्रथम मार्च २०२३ मध्ये निविदेद्वारे विक्रीस काढला होता. जवळपास २५०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडाच्या आताच्या योजना अंतर्गत झालेल्या विक्रीतून ‘सिडको'ला १५९ कोटी ७ लाख रुपये प्राप्त होणार आहेत. सदर भूखंडाला फाल्कोन इलेक्ट्रो टेक प्रा. लि. या कंपनीने सर्वाधिक बोली लावली आहे. तर वर्षभरापूर्वी सानपाडा, सेक्टर-२० (पामबीच) येथील भूखंडाला ५ लाख ५४ हजार रुपये अशी त्यावेळची सर्वाधिक बोली ‘सिडको'ला प्राप्त झाली होती.

नवी मुंबईतील भूखंडांचे दर गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ‘सिडको'च्या ऐरोली, घणसोली, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघर मधील काही मोक्याच्या भूखंडांना जास्त रकमेची बोली प्राप्त झाली होती. एकंदरीत ‘सिडको'चे भूखंड घेण्यासाठी विकासकांमध्ये देखील स्पर्धा लागलेली पहावयास मिळत आहे. त्यामुळेच सदर ३६ व्या भूखंड विक्री योजना अंतर्गत ‘सिडको'ला विविध ठिकाणच्या १८ भूखंड विक्रीसाठी विकासकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका उद्यानांतील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड