कोपरी गाव मध्ये ‘अखंड हरिनाम सप्ताह' सुरु                                  

 

  ७ दिवस घुमणार हरिनामाचा गजर

वाशी : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे आयोजन कोपरी गाव ग्रामस्थांद्वारे करण्यात आले आहे. या सप्ताहात कोपरी गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक मोठया भक्तीभावाने सहभाग घेत असून, सप्ताहाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य आदीतवार महाराज यांच्या प्रेरनेणे कोपरी गाव ग्रामस्थांद्वारे यंदाही  मार्गशीर्ष पंचमी शके १९४५, १ जानेवारी  ते  ८ जानेवारी २०२४ या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी कोपरी गावातील सत्यवान भोईर आणि रेणुका सत्यवान भोईर या  दांपत्याच्या हस्ते  मूर्ती अभिषेक आणि कलश पूजन करुन ‘अखंड हरिनाम सप्ताह'ला सुरुवात झाली. या ‘अखंड हरिनाम सप्ताह' काळावधीत रोज होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात  सकाळी ५ वाजता काकडा आरती, सकाळी ८ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी भजन आणि रात्री ८ वाजता नामांकित किर्तनकारांचे कीर्तन, आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. एकादशीच्या दिवशी ‘देवाची आळंदी'च्या धर्तीवर संपूर्ण कोपरी गावाला दिंडी प्रदक्षिणा  घातली जाते. या दिंडीत कोपरी गावातील सर्व महिला आणि ग्रामस्थ आवर्जून हजर असतात. ‘अखंड हरिनाम सप्ताह' मध्ये किर्तनकारांचे कीर्तन होणार असून, संपूर्ण कोपरी गाव हरिनामात तल्लीन होऊन, ७ दिवस कोपरी गावात हरिनामाचा गजर घुमणार आहे. कलश पूजनावेळी ‘कोपरी गाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष परशुराम ठाकूर, ह.भ.प. सोपान महाराज म्हात्रे, ह.भ.प. नामदेव महाराज ठाकूर, ह.भ.प. दीनानाथ भोईर, ह.भ.प. नकुल भोईर, दिनेश भोईर तसेच कोपरी गावातील वारकरी मंडळी, महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अखंड हरिनाम सप्ताह' निमित्त कोपरी गावात  स्वच्छतेचा जागर
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराला प्रथम क्रमांक प्राप्त व्हावा, याकरिता स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये  अधिकाधिक जागरुकता यावी म्हणून समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या तर्फे स्थानिकांना ‘डस्टबीन' वाटप करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही कोपरी गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधत गजर हरिनामाचा जागर स्वच्छतेचा या संकल्पनेतून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे म्हणून समाजसेवक परशुराम ठाकूर आणि केशव ठाकूर यांच्या द्वारे कोपरी गाव आणि वाशी सेक्टर-२६ मधील नागरिकांना येत्या ५ जानेवारी रोजी डस्टबीन (कचरा डबा) वाटप करण्यात  येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणेकर करदात्यांसाठी खुशखबर; मालमत्ता करा संबंधी अभय योजनेस दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ