ठाणेकर करदात्यांसाठी खुशखबर; मालमत्ता करा संबंधी अभय योजनेस दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ


मालमत्ता करातील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेस दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ

ठाणे  : ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता करातील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेस दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सदर व्याज माफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

यापूर्वी, महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, नाताळच्या सुट्या असल्याने ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

            या मुदतवाढीमुळे, जे करदाते दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित  महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100 % सवलत देण्यात येणार आहे.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायं. 5.00 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी 10.30 ते दुपारी 4.00  व रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कराचा भरणा करता येईल.

 त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच  Google Pay, PhonePe, PayTm, BhimApp याद्वारे  करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा गावांतील पाणी पुरवठा 05 ते 06 जानेवारी राेजी बंद राहणार