बहुप्रतिक्षीत ‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक'चे उद्‌घाटन दृष्टीपथात

एमटीएचएल पुलाच्या उद्‌घाटनाला १२ जानेवारीचा मुहूर्त?

नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहुप्रतिक्षीत मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) पुल लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. डिसेंबर महिन्यातच सदर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्‌घाटनासाठी वेळ नसल्याने या पुलाचे लोकार्पण लांबणीवर गेले. त्यातच आता या पुलाच्या उद्‌घाटनासाठी नवीन तारीख निश्चित झाली असल्याचे समजते. त्यानुसार येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी ‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. दरम्यान, समुद्रावर उभारण्यात येणारा सदरचा देशातील सर्वात मोठा पुल असून त्यांची लांबी २२ कि.मी. आहे. या पुलाचे जवळपास ९८ टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.

‘एमटीएचएल'वर १०० कि.मी. पर्यंत वेगाने कार चालवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए'च्या सुत्रांनुसार, या पुलावरुन दररोज १ लाख वाहने धावण्याची शक्यता आहे. २२ कि.मी. लांब असलेल्या या पुलाचा १६ किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. पुलाचा सगळ्यात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तीकालीन मदत लवकर मिळेल या हेतूने तात्काळ मदत देण्याची योजना बनवण्यात आली आहे.

आता इलेक्ट्रिक पोल, टोल नाका, ॲडमिन बिल्डिंगसह निर्माणसह अनेक लहान मोठी कामे सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबईहून थेट नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या पुलामुळे दोन शहरांमधील अंतर कमी होणार असल्याने प्रत्येक वर्षी १ कोटींपर्यंतच्या इंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही मुक्ती होणार आहे. परिणामी, प्रदुषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

येत्या १२ जानेवारी रोजी रोजी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे मध्य मुंबईतून शिवडी ते नवी मुंबईच्या चिर्लेपर्यंतचा प्रवास अगदी १५ ते २० मिनिटांत होणार आहे. शिवाय एमटीएचएस पुल सुरु झाल्यानंतर मुंबई आणि पुणे पर्यंतचा प्रवासही सोप्पा होणार आहे. देशातील सर्वात लांब समुद्री पुल असलेल्या मुंबई ट्रान्स-हार्बर सी लिंक १६.५ किमी लांब डेक असलेला भारतातील पहिला पूल असून यात ओपन रोड टोलिंग सिस्टम असणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेचा ३२ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा