अखेर कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

सिडको, रेल्वे प्रशासन द्वारे झोपडपट्टी धारक, बेघरांवर कारवाई

वाशी : कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात झोपडपट्टी धारक आणि बेघरांनी बस्तान बसवल्याने या परिसराला अवकळा आली होती. त्यामुळे सदर ठिकाणी कारवाई करुन कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर मोकळा करावा, अशी मागणी स्वराज्य पक्षाकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सिडको, रेल्वे प्रशासन यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात संयुक्त कारवाई करत कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर मोकळा केला.

काही महिन्यांपूर्वी कोपरखैरणे येथील सिडको भूखंडावर अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आलेल्या झोपडीधारकांनी त्यांचा मोर्चा कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेवर वळवून आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली. कोपरखैरणे रेल्वे परिसरात फूटपाथवर बेघर नागरिक त्याच ठिकाणी चूल मांडून रोजची उपजीविका करत होते. त्यांच्याकडून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवून दिवसेंदिवस याठिकाणी अस्वच्छता पसरत होती. त्यामुळे प्रवाशांना वाट काढणे कठीण झाले होते. तर रात्री या ठिकाणी मद्याचे प्याले भरले जात असल्याने कोपरखैरणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाट काढताना महिलांना भीती वाटत होती. त्यामुळे कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टी धारक आणि बेघरांवर कारवाई करण्याची मागणी ‘स्वराज्य पक्ष'द्वारे लावून धरण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर २८ डिसेंबर रोजी सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टी धारक आणि बेघरांवर कारवाई करत कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर मोकळा केला.

कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात निराधार आणि बेघर यांच्या अतिरिक्त वावरामुळे परिसराला बकालपणा आला होता. याशिवाय महिलांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोपरखैरणे रेल्वे स्थानक मधून रात्री ये-जा करताना महिलांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टी धारक आणि बेघरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कारवाई केल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानत आहे. - प्रशांत मिसाळ, सरचिटणीस - स्वराज्य पक्ष, कोपरखैरणे. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देवगड हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल