देवगड हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल

अडीच ते तीन हजार रुपये डझन दर

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात देवगड हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सदर देवगड हापूस आंबा हंगाम पूर्व आंबा असून, एपीएमसी फळ बाजारात रोज १८ ते २० पेट्या देवगड हापूस आंबा दाखल होत आहे. या आंब्याला आकार प्रमाणे अडीच ते तीन हजार रुपये डझन भाव मिळत आहे.

कोकणातील हापूस आंब्याची चव चाखायला सर्व ग्राहक नेहमीच आसुसलेले असतात. मात्र, खरा हापूस आंबा हंगाम सरासरी मार्च महिन्यात सुरु होऊन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो. परंतु, कोकणातील काही तुरळक शेतकऱ्यांकडे डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्येच हापूस आंबा तयार होतो. त्यामुळे बाजारात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुरळक हापूस आंबा आवक होण्यास सुरुवात होते. हंगाम पूर्व तयार होणारा हापूस आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. या हंगामातील हापूस आंबा सध्या एपीएमसी फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

देवगड मधील काही शेतकऱ्यांकडे हंगाम पूर्व हापूस आंबा तयार झाला असून, तो वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. या आंब्याला आकारानुसार अडीच ते तीन हजार रुपये प्रति डझन दर मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे आंब्याला पोषण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले निघणार असून, सर्वसामान्य आंबा शौकिनांना हापूस आंब्याची गोडी चाखण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे, अशी माहिती फळ विक्रेते अक्षय खेबडे यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पोलीस कल्याण रोजगार मेळावा'ला पोलीस पाल्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद