खारघर-तळोजा खाडीवरील नवीन उड्डाणपुल

कामाला लवकरच सुरुवात; ठेकेदाराकडून बांधकाम साहित्याची जमवा-जमव  

खारघर : तळोजा-खारघर खाडीवर उभारल्या जाणाऱ्या १.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामाला सिडको  संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. खाडीपुल उभारण्याचे काम मे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून यासाठी सिडको ९६ कोटी रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, १८ महिन्यात पुलाचे काम पूर्ण केले जाणार असल्यामुळे तळोजावासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.  

‘सिडको'ने नवी मुंबई मेट्रो सुरु केल्यामुळे खारघर तळोजावासियांचा प्रवास सुखकर झाल्यामुळे तळोजा-खारघर मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. दुसरीकडे ‘सिडको'कडून तळोजा थेट खारघरला जोडणाऱ्या तळोजा खाडीपुलाच्या कामाला मंजुरी देण्यात झाल्यामुळे तळोजा वासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. तळोजा पेंधर पूल ते खारघर, सेक्टर- २६ सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला उड्डाणपुल जोडला जाणार आहे. या बांधकामासाठी वन विभाग आणि इतर प्राधिकरणांची परवानगी मिळाली असून मँग्रोजच्या परवानगीची प्रक्रिया न्यायालयात असून तेही लवकरच मिळण्याची शवयता सिडको अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे तळोजा-खारघर खाडीपुल उभारणीच्या कामाचे आदेश जे. एम. म्हात्रे या बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जे. एम. म्हात्रे कंपनीकडून बांधकामासाठी लागणारे साहित्य रांजणपाडा गांव  खाडीलगत असलेल्या जागेत जमविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या जानेवारी महिन्यात कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेंधर पुलाच्या कामाला वेग...
तळोजा पेंधर पुलाच्या कामाला वेग आला आहे. तळोजा वरुन खारघरला जोडणाऱ्या दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर ३४ मीटरच्या ग्रेडर उभारणीसाठी रेल्वे कडून हिरवा कंदील मिळाला आहे. तर मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारल्या जाणाऱ्या पुल उभारणीसाठी एमएसआरडीसी कडून परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या नवीन वर्षात पेंधर पुलाचे काम पूर्ण होणार असल्यामुळे तळोजा फेज-२ मधील रहिवाशांचा पनवेल, खारघर आणि ठाणे प्रवास सोयीचा होणार आहे.

कोस्टल रोड परवानगीसाठी प्रयत्न...
खारघर, सेक्टर-१६ स्पॅगेटी ते सीबीडी दरम्यान खाडीकिनारा दरम्यान २७३ कोटी रुपये खर्च करुन उभारला जाणाऱ्या  कोस्टल रोडसाठी काही परवानग्या मिळाल्या असून खाडीत उभारल्या जाणाऱ्या पुलामुळे मँग्रोजच्या परवानगीसाठी न्यायालयाकडून लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा ‘सिडको'ला आहे. कोस्टल रोड मुळे खारघर, तळोजा वसाहती मधून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना नवी मुंबई पामबीच आणि कोस्टल रोडने थेट खारघर टोल नाक्यावर पर्यंत विना अडथळा जाता येणार आहे. खारघर ते सीबीडी, सेवटर-११ खाडीकिनाऱ्यापर्यंत अंदाजे ५ किलोमीटर अंतराचा कोस्टल रोड असून  खारघर, तळोजा वासियांना  सीबीडी, सेक्टर-११ मार्गे नवी मुंबई विमानतळावर आणि मुंबईसाठी पामबिच वरुन विना अडथळा जाता येणार आहे.

तळोजा मधील ‘सिडको'च्या घरांना मागणी...
‘सिडको'कडून तळोजा मध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार आहे. तळोजा, खारघरला जोडणाऱ्या पेंधर आणि तळोजा खाडीपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच ‘सिडको'कडून येत्या नवीन वर्षात तुर्भे-खारघर लिंक रोड उभारणीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई, नवी मुंबई मार्गे तुर्भे-खारघर लिंक रोड सेंट्रल पार्क लगत असलेल्या ३० मीटर रुंंदीच्या रस्त्यामध्ये सदर मार्ग विलीन होणार  आहे. नवी मुंबई मेट्रो तसेच तळोजा-खारघर खाडीवरील उड्डाणपुल, तुर्भे-खारघर लिंक रोड आणि सीबीडी-खारघर कोस्टल रोड मधून तळोजा वसाहतीत विना अडथळा जाता येणार असल्यामुळे ‘सिडको'कडून  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तळोजा वसाहतीमध्ये मधील सेक्टर-२८, २९, ३१, ३४, ३६, ३९, ४० मध्ये उभारल्या जाणाऱ्या गृह प्रकल्पाला अधिक मागणी येणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

तळोजा-खारघर खाडीउड्डाणपुल झाल्यास तळोजा वसाहत, परिसरातील गावे आणि तळोजा औद्योगिक क्षेत्रासाठी सोयीचे होणार आहे. ‘सिडको'ने तळोजा वसाहत ते औद्योगिक क्षेत्रात रस्ते उपलब्ध करणे आवश्यक आहे.
-सतीश शेट्टी, अध्यक्ष-तळोजा इंडस्ट्रिअल असोसिएशन.

तळोजा-खारघर खाडीपुल उभारणीला ‘सिडको'ने मजुरी दिली आहे. सदर पुल खारघर, सेक्टर-२६ कडून सेंट्रल पार्क मार्गे  तुर्भे-खारघर लिंक रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे तळोजा आणि खारघर वसाहत मधील वाहतूक समस्या दूर होणार आहे.
-प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी-सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर ‘महावितरण अधिकाऱ्यांना' जाग