अखेर ‘महावितरण अधिकाऱ्यांना' जाग

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला यश

वाशी : नवी मुंबई मधील पावणे एमआयडीसी परिसरात वीज वाहिन्या जीर्ण होऊन त्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पावणे एमआयडीसी परिसरातील जीर्ण, धोकादायक वीज वाहिन्या बदलण्याची मागणी ‘मराठा प्रतिष्ठान सामाजिक संस्था'चे संस्थापक-अध्यक्ष तथा समाजसेवक अरुण पवार आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार केली होती. अखेर ‘महावितरण'ला जाग आली असून, पावणे एमआयडीसी परिसरातील जीर्ण, धोकादायक वीज वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने अरुण पवार आणि मनोज चव्हाण यांच्या मागणीला यश आले आहे.

पावणे एमआयडीसी परिसरात वाढत्या विजेच्या मागणीमुळे जीर्ण झालेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांवर ताण येऊन त्या वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वरचेवर घडल आहेत. १० डिसेंबर २०२३ रोजी आलोक कंपनी जवळ वीज वाहिनी तुटून पावणे गाव मध्ये राहणाऱ्या वैभव जाधव (वय-२८) याच्या अंगावर पडली होती. या दुर्घटनेत वैभव जाधव याच्या पाठीला जखम झाली होती. मात्र, जीर्ण वीज वाहिनी तुटताच (फिडर) स्वयंचलित यंत्रणेने वीज प्रवाह बंद झाल्याने या घटनेत विजेचा धक्का लागण्याचा अनुचित प्रकार टळला होता. तर याआधीही पावणे एमआयडीसी परिसरात वीज वाहिन्या तुटून खाली पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, पावणे एमआयडीसी परिसरात जीर्ण, धोकादायक वीज वाहिन्या तुटून पडल्यास एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शवयता असल्याने पावणे परिसरातील जीर्ण, धोकादायक वीज वाहिन्यांच्या बाबतीत तात्काळ योग्य निर्णय घेऊन नवीन वीज वाहिन्या टाकाव्यात, अशी मागणी समाजसेवक अरुण पवार आणि मनोज चव्हाण यांनी ‘महावितरण'कडे लावून धरली होती. अखेर ‘महावितरण कंपनी'च्या अधिकाऱ्याना जाग आली असून, पावणे परिसरातील जीर्ण, धोकादायक वीज वाहिन्या बदलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने पावणे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर, पनवेल मधील २७ अनधिकृत पान टपऱ्यांवर महापालिकेची तोडक कारवाई