महापालिका तर्फे कोपरखैरणे मध्ये दोन आकांक्षी शौचालय उभारणी

टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेचा आकर्षक अविष्कार

 नवी मुंबई : स्वच्छता आणि सुशोभिकरणाकडे प्राधान्याने लक्ष देणारी नवी मुंबई महापालिका नेहमीच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक अभिनव शौचालय टाकाऊतून टिकाऊ या संकल्पना अंतर्गत कोपरखैरणे सेक्टर-१४ मध्ये उभारण्यात आले असून, शासनाच्या निकषानुसार बनविण्यात आलेल्या या आकांक्षी शौचालयाचे (Aspirational Toilet) लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त (परिमंडळ-१) सोमनाथ पोटरे, उपआयुक्त (परिमंडळ-२) डॉ. श्रीराम पवार, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता विजय राऊत, सुधाकर मोरे, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे आणि इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.


घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्याचा पुनर्वापर एक महत्वाची बाब असून, कोपरखैरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना ४२६ चौ. मी. क्षेत्रफळाच्या पुर्नप्रक्रियाकृत प्लास्टिक शीटचा वापर करण्यात आलेला आहे. याशिवाय ५.३० मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट ११ हजार ७०० पेक्षा अधिक प्लास्टिक बाटल्यांचा वापर करुन करण्यात आला असून, त्यातही लक्षवेधी बाब म्हणजे या शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे ३५ हजार २०० पेक्षा अधिक बाटल्यांच्या झाकणांचा कलात्मक वापर करुन निर्माण करण्यात आलेली आहेत.

शौचालय सजावटीसाठी संगणकाच्या ८५ की-बोर्डचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसेच शौचालयासमोर तयार करण्यात आलेल्या आकर्षक वाहन प्रतिरुपासाठी २८४ किलो इतक्या वजनाच्या टाकाऊ लोखंडी वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. शौचालयासमोर नयनरम्य कारंजे उभारण्यात आले असून, या कारंज्यासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्यात येत आहे. आकांक्षी शौचालय उभारताना सर्वच बाबींमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलेला असून, आकांक्षी शौचालय ‘थ्री आर' संकल्पनेचे उत्त्म उदाहरण आहे.

७५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या शौचालय बांधकामात पुरुषांसाठी ४ शौचकुपे, १ स्नानगृह आणि ३ मुताऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांकरीता ३ शौचकुपे, १ स्नानगृह आणि १ बेबी टॉयलेट व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांसाठीच्या शौचालय व्यवस्थेत बेबी केअर सुविधा तसेच सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन, इन्सिनिरेटर, हॅन्ड ड्रायर आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगासाठी स्वतंत्र शौचकुपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

कोपरखैरणे सेवटर-१४ मध्ये उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालय प्रमाणेच कोपरखैरणे सेवटर-१९ मधील धारण तलावाजवळ आकांक्षी शौचालय उभारण्यात आलेले असून, या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेने टाकाऊ पासून टिकाऊ रचनेचा नवा अविष्कार घडविला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका तर्फे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई