खारघर मध्ये ‘अंडर वॉटर फिश टनेल'

देश-विदेशातील ५ हजार मासे पाहण्यासाठी गर्दी

खारघर : खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खारघर महोत्सव मध्ये देश-विदेशातील विविध प्रकारचे ५ हजार मासळीच्या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेता परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ‘खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन'चे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर,  माजी उपसरपंच संतोष गायकर, भाजप पदाधिकारी नितेश पाटील, सचिन वास्कर यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

दुबई मध्ये गेल्यास अंडर वॉटर फिश टनेल पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवर्जून सांगितले जाते. दुबई सारखा अंडर वॉटर फिश टनेल पाहण्याचा आनंद नवी मुंबई, पनवेल मधील मत्स्य प्रेमींना घेता यावा, यासाठी खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन द्वारे खारघर मधील घरकुल वसाहत शेजारील मोकळ्या मैदानात खारघर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात अंडर वॉटर फिश टनेलच्या माध्यमातून एकाच वेळी देश-विदेशातील विविध प्रजातीची पाच हजार मासळी ती देखील बोगद्यात असल्यामुळे नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. ‘मासळी'साठी तयार करण्यात आलेल्या बोगद्यात स्टारफिश, क्लाउनफिश, एंजेल फिश, समुद्री घोड़े, रैसेस, बॉक्सफिश, ईल अशा विविध प्रकारचे २ इंच पासून ते ६ फुट पर्यंत विविध जातीचे मासे पाहता येणार आहेत.

खारघर मध्ये तेही बोगद्यात विविध प्रकारच्या मासळी पाहताना सिंगापूर, दुबई या ठिकाणी अंडर वॉटर फिश टनेल पाहण्याचा आनंद घेत असल्याचा भास होत आहे. खारघर सारख्या शहरात ‘अंडर वॉटर फिश टनेल' सारखा अनोखा उपक्रम आयोजित करुन गुरुनाथ गायकर यांनी वेगळा पायंडा पाडला आहे, असे महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी परेश ठाकूर यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्यात पहिलाच ‘अंडर वॉटर फिश टनेल' महोत्सव भरवण्यात आला असून, यामध्ये एकाच वेळी देश- विदेशातील मासळी तेही बोगद्यात पाहण्याचा आनंद नागरिक घेत आहेत. महोत्सवात विविध प्रकारचे वस्तू आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. ‘अंडर वॉटर फिश टनेल' या उपक्रमासाठी जवळपास पन्नास लाखाहून अधिक खर्च झाला आहे. - गुरुनाथ गायकर, अध्यक्ष-  खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन, खारघर.

शालेय मुले-मुलींना नाताळची सुट्टी आहे. त्यात बोगद्यात मुलांसह विविध प्रकारची मासळी पाहून खूप छान वाटले.  मासळी सोबत  सेल्फी काढण्याचा आनंद घेतला आहे. - प्रतिक महाले, खारघर.

 ‘अंडर वॉटर फिश टनेल' मध्ये एकाच वेळी देश-विदेशातील मासळी पाहण्याची पहिलीच वेळ आहे. मुलांना देखील सदर उपक्रम खुप आवडला - नेहा उतेकर, रहिवासी -खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घाबरू नका… पण जागरूक रहा