वायू प्रदूषणामुळे पुन्हा एकदा काेंडला नागरिकांचा श्वास?

हवा गुणवत्ता ‘२३२ एक्यूआय'वर

 वाशी : मुंबई उच्च न्यायालयाने वायू प्रदूषणाची दखल घेतल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना आखल्यानंतर नवी मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने घेतलेली दखल सैल होताच नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा वायू प्रदूषण वाढल्याने २३ डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता ‘२३२ एक्यूआय'वर गेली होती. नवी मुंबई शहरात होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या दर्प वासाने रहिवाशांचा श्वास मात्र कोंडला जात आहे.

 दिवाळी पूर्वी मुंबई परिसरातील वाढत्या वायू प्रशासनाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून सुमोटो याचिका दाखल करुन घेत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेस दिले होते. त्यापार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई महापालिकेने देखील वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला होता. मात्र, या उपाययोजना सैल होताच वायू प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून २२ आणि २३ डिसेंबर रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडले गेले होते. यावेळी हवा गुणवत्ता २३२(अतीखराब) एक्यूआय वर गेली होती. या वायू प्रदूषणाची तीव्रता इतकी होती की, सर्वत्र दाट धुके दिसत होते. तसेच प्रदूषित वायूच्या दर्प  वासामुळे नागरिकांना मळमळ,श्वास घेण्यास त्रास होणे, अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे वारंवार सोडत असलेल्या प्रदूषित वायूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन नागरिक भयभीत होत आहेत. दरम्यान, वायू प्रदूषणातून नवी मुंबई शहरातील रहिवाशांची सुटका होऊन त्यांना मोकळा श्वास कधी घेता येईल?, असा सवाल प्रो. विलीन कुमार सिंग यांनी उपस्थित केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल, नवीन पनवेल मधील टोइंग व्हॅन बंद