कोरोना जेएन-वन व्हेरिएंटः मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक, फायर ऑडीट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
 

ठाणे : देशात आणि राज्यात सध्या कोरोना जेएन-१ या नवीन विषाणू प्रकारातील रुग्ण आढळून येत आहेत.यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे, त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस्‌ यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करतानाच, राज्यभरातील आरोग्य  यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सदर बैठक नुकतीच घेतली. यामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांट्‌स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी आणि योग्य पध्दतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, लसीकरण झालेले नसलेल्या व्यवतींची माहिती घ्यावी आणि लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, लस आणि औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करुन घ्यावी, आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोव्हीड संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत भारत देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले.

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्‌स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्‌स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्‌स आणि ६ हजार व्हेंटिलेटर बेड्‌स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, असे मिलिंद म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,कोव्हीड जेएन-१ या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे यावेळी प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी जाहीर केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायू प्रदूषणामुळे पुन्हा एकदा काेंडला नागरिकांचा श्वास?