बदली आदेश रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव?

१५० अधिकारी-कर्मचारी यांची बदली

वाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनात एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या १५० अधिकारी-कर्मचारी यांचे बदली आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी काढले आहेत. मात्र, बदली झालेले चार-पाच अधिकारी-कर्मचारी वगळता इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजून नवीन पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे आता बदली रद्द करण्यासाठी बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यावर राजकीय दबाव वाढवला जात असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ८  डिसेंबर २०२३ रोजी दीडशे अधिकारी-कर्मचाचारी यांच्या बदलीले आदेश काढले आहेत. यात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, विद्युत अभियंता, लिपिक, सफाई कामगार, वैद्यकीय कर्मचारी तसेच उद्यान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सदर बदली आदेश पारित होताच बदली झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी तात्काळ नवीन जागेवर रुजू व्हावे, बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींचे तसेच स्वतः चे निवेदन देऊ नये, असे बदली आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, सदर बदली आदेश काढून आज १७ दिवस उलटले तरी यातील ९५ % अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजून नवीन पदभार स्विकारला नाही. तर बदली आदेश काढल्यानंतर बदली आदेश आपणच  एक दिवसाने रोखून धरले होते. १३ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व अधिकारी-कर्मचारी नवीन जागेवर असतील,  अशी प्रतिक्रिया महापालिा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली होती. मात्र, बदली आदेश निघून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी होत आला तरी बदली झालेले अधिकारी-कर्मचारी जागेवरच आहेत. यातील बहुतांश अधिकारी नवीन जागेत जाण्यासाठी तयार नसून, ते बदली आदेश रद्द करावे म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यावर दबाव वाढवत असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर त्यांनीच काढलेले बदली आदेश रद्द करतील का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिका आयुक्त एखादा आदेश काढत असतील आणि दबावाला बळी पडून त्याची जर अंमलबजावणीच करत नसतील तर  त्या आयुक्तांकडून इतर कामात शहरवासीयांना न्याय मिळण्याची अपेक्षा कशी करु शकता?. - मंगेश लाड, सरचिटणीस-समाज समता कामगार संघ. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोरोना जेएन-वन व्हेरिएंटः मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा