तुर्भे स्टोअर येथील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर प्रारंभ

माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या मागणीला अखेर यश

तुर्भे : मागील २० वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या तुर्भे स्टोअर येथील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर २२ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) तिरुपती काकडे यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) तिरुपती काकडे यांनी २२ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करुन वाहतूक व्यवस्थेमध्ये कशाप्रकारे पालट करण्यात येणार आहे, याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नवी मुंबई महापालिका कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे, तुर्भे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तुर्भे स्टोअर भागातील लोकसंख्या ७० हजार असून, येथे औद्योगिक वसाहतीत २५ हजारांहून अधिक लोक ये-जा करण्याकरिता अतिशय वर्दळीचा असलेला ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडत असतात. रस्ता ओलांडताना अपघातात अद्यापपर्यंत २० पेक्षा अधिक स्थानिक रहिवाशांचा मृत्यू झाला असून, ४० पेक्षा अधिक लोकांना अपंगत्व आले आहे. अतिशय वर्दळीचा असलेला ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर स्काय वॉक करुन नागरिकांच्या जीवाचे रक्षण करावे अशी, मागणी २० वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिका सभागृहात केली होती. त्यावेळी ७ कोटी रुपये खर्चाचे २ स्काय वॉक बांधण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदामध्ये अंदाजित रवकमेपक्षा जास्त रवकमेची निविदा आल्याने महापालिकेने स्काय वॉक बांधण्याचे काम रद्द केले. त्याच वेळेस महापालिकेने स्काय वॉक बांधण्याचे काम केले असते, तर काही लोकांचा जीव वाचला असता, अशी खंत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

महापालिकेने तुर्भे स्टोअर येथे स्काय वॉक बांधण्याचे काम रद्द केल्यानंतर १० वर्षांनी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. यासाठी रस्ता रोको, महापालिका अधिकाऱ्यांना घेराव, अशी उग्र आंदोलनेही केली होती. त्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, उड्डाणपुलाच्या अंडरपास मधून केवळ रिक्षा, कार जाईल असे डिझाईन करण्यात आले. सदर डिझाईन बदली करण्याची सूचना केली. त्यामुळे काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला विलंब होत गेल्याने तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचे काम रखडले होते. अखेर २०२० साली तत्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचा जनतेच्या जिविताचा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामाला गती येऊन अखेर २२ डिसेंबर पासून तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचे काम प्रत्यक्षात चालू होत आहे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आभार व्यक्त करत आहे, असे सुरेश कुलकर्णी यांनी नमूद केले.

दरम्यान, तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याच्या कामासाठी वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ६ अधिकारी, ३० अंमलदार, १२० ट्रॅफिक वॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन चालकांनी तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याच्या कालावधीत येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहाण्याकरिता वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तिरुपती काकडे यांनी केले आहे.

तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुल बांधण्याचे काम १८ महिन्यांचे असून, सदर काम मे. महावीर इन्प्रÀास्ट्रवचर कंपनीला देण्यात आले आहे. एकूण ३२ कोटी रुपये या कामासाठी खर्च होणार आहेत, असे महापालिका कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बदली आदेश रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव?