नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

सिडको हॅशटॅगवर मेट्रो प्रवासाचे फोटो, रिल्स शेअर करण्याबाबतही प्रवाशांचा उत्साह

नवी मुंबई : ‘सिडको'च्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्रमांक-१ वर बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत ४ लाख ३० हजार प्रवाशांनी मेट्रो मधून प्रवास केला आहे. मेट्रोला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, केवळ परिवहनाचे साधन म्हणून नव्हे; तर ‘आपली मेट्रो' या भावनेतून नवी मुंबईकरांचे मेट्रोबरोबर एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. तसेच ‘सिडको'ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर ‘सिडको'च्या #jabwemetro आणि #CIDCO या हॅशटॅगवर आपल्या मेट्रो प्रवासाची छायाचित्रे, रिल्स आणि अनुभव शेअर केले आहेत.

‘सिडको'च्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर दरम्यान १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरु झाली असून, प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या मार्गावरील ‘मेट्रो रेल्वे'ला लाभत आहे. या मार्गावर दरदिवशी सरासरी १२ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मेट्रो सुरू झाल्यापासून १ महिन्यांच्या कालावधीत ४ लाख ३० हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला असून कामकाजाच्या दिवशी नोकरदार वर्ग आणि सुट्टीच्या दिवशी ‘सिडको'च्या सेंट्रल पार्क उद्यानाला भेट देणारे पर्यटक यांचा मेट्रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. ‘मेट्रो रेल्वे'च्या रुपाने नवी मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे सर्व वयोगटांतील आणि विविध वर्गांतील प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे स्टोअर येथील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर प्रारंभ