पनवेल मधील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्तम प्रतिसाद

कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावरती बंदी

पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवरती भर देत असून, चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. १ एप्रिल २०२३ महिन्यापासून ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत २२७ कोटी रुपये इतका मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये नऊ महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची सदर पहिलीच वेळ आहे. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना महापालिका द्वारे जप्तीपूर्व नोटीसा देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित विकास कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवरती भर देत आहे. महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या  औद्योगिक, निवासी, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावणी संबधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास महापालिका मालमत्ता कर विभागाने सुरुवात केली आहे. येत्या काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी म्महापालिकेने चार प्रभागांसाठी सहा पथके तयार केली आहेत. यामध्ये खारघरसाठी १ पथक, कामोठेसाठी १ पथक, नावडेसाठी १ पथक, तळोजा एमआयडीसी प्रभागासाठी १ पथक, कळंबोली प्रभागासाठी १ पथक, पनवेल आणि नवीन पनवेलसाठी प्रत्येकी १ पथक तयार करण्यात आले आहे.

मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी महापालिका तर्फे महापालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकर द्वारे जनजागृती केली जात आहे. मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’  मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्ता कर वसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका द्वारे करण्यात आले आहे.

 महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर म्हणजे प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरुन पनवेल शहराच्या विकासाचे भागीदार बनावे, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

मालमत्ता कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावरती बंदी येणार आहे. तसेच मालमत्ता कराचा बोजा मालमत्तेवरती चढविला जाणार आहे. याचबरोबर स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरात मालमत्ता कर भरावा, अशी अपेक्षा आहे. - गणेश देशमुख, आयुक्त - पनवेल महापालिका. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

साहित्य मंदिर वाशी येथे ग्रंथालीच्या विज्ञानधारा - आरोग्य यात्रेची सांगता होणार