मोहा गावातील ४ मजली बेकायदा इमारत जमीनदोस्त  

 ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची कारवाई

नवी मुंबई : सिडको क्षेत्रातील मोहा गावात बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या ४ मजली अनधिकृत इमारतीवर ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई करुन सदरची इमारत जमीनदोस्त केली. सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे मुख्य नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.  

सिडको क्षेत्रात अनधिकृत बांधकामे वाढीस लागल्याच्या तक्रारी सिडको अनधिकृत बांधकामे नियंत्रण विभागास प्रापत झाल्या आहेत. त्यात मोहा गावातील सर्व्हे नंबर-३५ येथे तळमजला अधिक ४ मजल्याची अनधिकृत इमारत उभारण्यात आल्याची माहिती सिडको प्रशासनाला मिळाली होती. सदर इमारतीचे बांधकाम करताना सिडकोकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत १८ आणि १९ डिसेंबर रोजी ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली. तसेच सदरचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. या कारवाईसाठी ‘सिडको'च्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, सिडको पोलीस पथक, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्यासह २ पोकलान, २ जेसीबी, ६ जीप, १० कामगार असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल मधील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्तम प्रतिसाद