बेलापूर, वाशी मध्ये लवकरच नवीन वाहनतळ

पार्कींग नियोजनासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे गतीमान कार्यवाहीचे निर्देश

नवी मुंबई : सध्या गाड्यांचे प्रमाण वाढल्याने सर्व शहरांसमोर गाड्यांच्या पार्कींगची बिकट समस्या उभी राहिलेली दिसून येते. नवी मुंबई शहरातही वाहने उभी करण्याची समस्या असून, ती दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः बारकाईने लक्ष  देत आहेत. यादृष्टीने महापालिकेचा संबंधित विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासमवेत नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत सीबीडी-बेलापूर सेवटर-१५ येथे ६९०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच वाशी सेक्टर-३०ए येथे हॉटेल तुंगा समोर ११३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या दोन्ही वाहनतळांची जागा रेल्वे स्टेशनजवळ असून, या परिसरात मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने अशी वाहनांच्या दृष्टीने वर्दळ असून, या वाहनतळांचा फायदा वाहनांच्या मालक, चालकांना होण्यासह या भागातील वाहने उभी करण्याच्या नियोजनालाही लाभदायी ठरणार आहे. या वाहनतळाच्या जागा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घSत तत्परतेने सर्वेक्षण करुन जलद कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियंत्रिकी आणि मालमत्ता विभागांना दिले.

सदर दोन्ही वाहनतळ शासन आणि खाजगी संस्था भागिदारी (Public Private Partnership) तत्वावर विकसीत करण्याचे नियोजन असून, याबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमोर करण्यात आले. या अंतर्गत संस्थेमार्फत वाहतुकीची वर्दळ, वाहनतळाच्या जागेची रचना आणि उपलब्धता तसेच सध्या सदर परिसरात वाहने उभी करण्यासाठी वापरली जाणारी पध्दती, अशा विविध बाबींचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सध्या कार्यालये आणि इतर व्यावसायिक गोष्टीने गजबजलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्याचे दिसून येत असून त्यामुळे वापर करावयाच्या रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीला बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने सदर दोन्ही वाहनतळ उपयोगी ठरणार आहेत. या भागातील सध्याच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या विकासाचाही आणि त्यामुळे वाढणाऱ्या वाहनांचाही विचार करावा, असे बैठकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.

सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिका मार्फत विविध ठिकाणी वाहनतळासाठी निश्चित केलेले दर यांचाही तौलनीक अभ्यास करावा आणि याबाबत आयआयटी कडूनही दर तपासून घ्यावेत, असे निर्देशही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

वाहनतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन करताना विविध पर्यायांचा विचार करावा तसेच प्रत्येक टप्प्यावरील सर्वेक्षण काटेकोरपणे करावे, अशी सूचना बैठकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधितांना केली.

याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, उपायुवत (मालमत्ता विभाग) डॉ. राहुल गेठे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोहा गावातील ४ मजली बेकायदा इमारत जमीनदोस्त