रहिवाशांच्या एकजुटीमुळे अतिक्रमणाचा कट असफल

 रोप लागवड केल्याने भूमाफियांचे स्वप्न भंग

खारघर : खारघर सेक्टर-१९ मधील काही हौसिंग सोसायटी मागील आरक्षित असलेल्या ट्री बेल्ट जमिनीवर काही समाजकंटक डोळा ठेवून रात्री अनधिकृत बांधकाम करीत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकत्र येवून सदर जमिनीवर रोप लागवड करुन भूमाफियांचे स्वप्न उधळल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

खारघर सेक्टर-१९ मध्ये सिडको तर्फे ‘ट्रीबेल्ट'साठी जमिन आरक्षित ठेवली आहे. दरम्यान, सदर राखीव आरक्षित जागा हडपण्याच्या तयारीत काही समाजकंटक असल्याचे राज रेसिडेन्सी, पूजा रेसिडेन्सी आणि रीजन्सी क्रिस्ट सोसायटी मधील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर प्रकार तात्काळ माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील आणि समाजसेवक किरण पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर किरण पाटील यांनी सदर प्रकार पनवेल महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या निदर्शनास आणून दिला. पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन जितेंद्र मढवी यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पाठवून सुरु असलेले सदर अनधिकृत बांधकाम हटवले. रहिवाशांनी तात्काळ सदर जमिनीवर रोप लागवड करुन संगोपनाची जबाबदारी देखील सोसायटीतील रहिवाशांनी घेतली. या लढ्यात राज रेसिडेन्सी, पूजा रेसिडेन्सी आणि रीजन्सी क्रिस्ट सोसायटी मधील महिला-पुरुष सहभागी झाले होते.  

नागरिकांच्या एकजुटीमुळे अनधिकृत बांधकाम रोखण्यात यश आले. तसेच पनवेल महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सहकार्य केल्यामुळे होणारे अतिक्रमण रोखण्यात यश आले, असे किरण पाटील यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर, वाशी मध्ये लवकरच नवीन वाहनतळ