मराठी नामफलक लावण्यासाठी दुकानदारांची धावपळ

पनवेल महापालिका द्वारे नोटीस नंतर अचानक जाग

 खारघर : पनवेल महापालिका हद्दीतील दुकानांवर मराठी पाट्या नसल्याच्या विरोधात महापालिकेकडून नोटीस बजावल्यानंतर  मराठी पाट्या दुकानांवर लावण्यासाठी दुकानदारांची धावपळ सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क' नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहार, खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे आदि प्रकारच्या प्रत्येक आस्थापनेचा, दुकानाचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीत मराठी भाषेत नामफलक नसलेल्या दुकाने आणि आस्थापनांना नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठी (देवनागरी) लिपीत असावाच तसेच इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा, असे नमूद करुन दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी महापालिका प्रभाग कार्यालयाकडून कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान,  दुकाने आणि आस्थापना यांवर मराठी नामफलक लावण्यात यावेत, असे परिपत्रक महाराष्ट्र राजय शासनाने २००८ मध्ये काढले होते. दुकानासमोरील नामफलक (पाटी) मराठी भाषेत असावी, अशी सूचना शासनाने देवूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे २०१७-१८ मध्ये खारघर मध्ये ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या कार्यकर्त्यांनी काही व्यावसायिकांकडून मात्र मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे पत्र पनवेल महापालिकेला देवून मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे काही दुकानदारांनी मराठी नामफलक लावले होत्या. तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सर्व दुकानांवरील पाट्या २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेतच असाव्यात अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे पनवेल महापालिका तर्फे दुकानदारांनी   मराठी पाट्या लावाव्यात, असे जाहीर आवाहन करुन नोटीस देखील बजावण्यात आली होती. यावेळी काही दुकानदार न्यायालयाचा अपमान करीत असल्यामुळे ‘मनसे' कार्यकर्त्यांनी खारघर मधील दुकानांना काळे फासले होते. महापालिकेकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी आणि मनसैनिकांकडून होणारी तोडफोड लक्षात घ्ोवून खारघर मधील दुकानदारांकडून मराठी पाट्या लावण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे दिसून येते. खारघर परिसरात ‘दुकान नामफलक'चे काम करणारे कामगार ८ ते १० असून, दिवसांगणिक पन्नास ते साठ बॅनर दुकानासमोर लावले जात असल्याचे पेंटरकडून सांगण्यात येत आहे. तर व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खारघर परिसरात जवळपास ३५ ते ४० टक्के पेक्षा अधिक दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याचे सांगण्यात आले.

दुकानांसमोर मराठी फलक लावण्यासाठी कमीत कमी एक हजार ते चार हजार रुपये खर्च येत आहे. काही दुकानदारांनी डिजिटल आणि विद्युत रोषणाई युवत आकर्षक नामफलकांची मागणी केल्यास नऊ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी बहुतांश दुकानदार एक ते दीड हजार खर्च करुन तातडीने दुकानांसमोर मराठी भाषेतील नामफलक लावत आहेत.

दुकानावर मराठी भाषेचा फलक असावा, अशा आशयाची नोटीस पाठविली जात असल्यामुळे दुकानदारांची मराठी पाट्या लावण्यासाठी धावपळ सुरु आहे. रोज पाच ते सहा दुकानांवर मराठी भाषेतील नामफलक लावण्याचे काम केले जात आहे. - सेवादास राठोड, पेंटर - सेवादास आर्ट, खारघर.

खारघर परिसरात मोठ्या संख्येने दुकाने आहेत. त्यातील जवळपास चाळीस टक्के दुकानदारांनी दुकानासमोर मराठी भाषेतील नामफलक लावला आहे. सर्व दुकानदार आणि आस्थापना यांनी शासनाच्या नियमाचे पालन करुन मराठी नामफलक लावावेत, असे आवाहन आहे. - अंबालाल पटेल, अध्यक्ष - व्यापारी असोसिएशन, खारघर (भाजपा). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजा बंदरात बोटीला लागलेल्या आगीत बोट भस्मसात