जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने निश्चितच जबाबदारी वाढली

ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी. सावळाराम पुरस्काराचे वितरण

ठाणे  : प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो, पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवित असताना अनेक यशापयशाला सामोरे जावे लागते, असा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा असे यशापयशाचे क्षण आणखी उजळून निघतात. जनकवी पी. सावळाराम यांच्या नावाने प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच  बळ देणारा तसेच आमची जबाबदारी वाढविणारा आहे असे उद्गगार  पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

 ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी. सावळाराम पुरस्काराचे वितरण रविवारी (17 डिसेंबर) राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाले. यंदाचा पी. सावळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके (धनादेश रक्कम 75,000, स्मृतीचिन्ह, शाल),  गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले- प्रभुलकर (धनादेश रक्कम 51,000, स्मृतीचिन्ह, शाल), साहित्यक्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रा. मंदार टिल्लू,तर उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी (प्रत्येकी धनादेश रक्कम 25,000 स्मृतीचिन्ह व शाल) यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2  प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, पी. सावळाराम कला समितीचे उदय पाटील, ओमकार पाटील आदी उपस्थित होते.

गदिमा आणि पी.सावळाराम हे समकालीन होते. पी. सावळाराम यांच्या गाण्यात गोडवा आहे.. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनी बाबा गेला.. हे बोलणे सोपे आहे. परंतु सोपे लिहणे हे फार कठीण आहे. लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो आहे. मानसीचा चित्रकार तो… अशी सुंदर गाणी त्यांनी लिहली. कविता या सुंदरच असतात, परंतु त्या कवितांना जेव्हा स्वरांचे कोंदण लागते तेव्हा त्या अप्रतिम होतात असे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी नमूद केले. पूर्वीचा काळा हा खरा संगीताचा होता, त्या काळातील मी शेवटचा छोटा संगीतकार आहे असे सांगताना नव्या पिढीशी माझे सूर जुळत नाहीत, ही पिढी फार पुढे गेली आहे हे मी चांगल्या अर्थाने म्हणतो असेही श्री. फडके म्हणाले. अनेक गीतकारांनी मला शब्द दिले, तसेच रसिकांच्या डोळ्यातील भाव हा माझा आशिर्वाद असल्याचे सांगत आज पी. सावळाराम यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी ठाणे महापालिकेचे व जनकवी पी. सावळाराम समितीचे आभार व्यक्त केले.

  पी. सावळाराम हे प्रत्येकाच्या ओठावर असणारे नाव आहे. आईने कवितांची गोडी लावली. विठू विठू माझा लेकुरवाळा, धागा धागा अखंड विणूया.. ही गाणी मी ऐकली आहेत आणि त्या गाण्यांचे जनक असलेल्या पी. सावळाराम यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचा आनंद तर आहेच परंतु याचे श्रेय माझे एकटीचे नसून माझे कुटुंबीय, गुरू तसेच माझ्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या रसिकांचे असल्याचे मत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केले. यावेळी विं.दा. करंदीकर यांची 'उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा.. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा' ही कविता मधुराणी गोखले यांनी सादर केली.

पत्रकाराचे आयुष्य हे बांधलेले असते, अनेक पत्रकारांकडे प्रतिभा असते, पण ही प्रतिभा मांडताना माणसांच्या भावना या लिहता आल्या पाहिजेत असे नमूद करताना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी पी. सावळाराम यांच्याकडे माणसांच्या भावना लिहण्याची प्रतिभा होती असे उद्गार त्यांनी काढले. तर प्रा. मंदार टिल्लू यांनी सध्या शिक्षकांसमोर असलेली आव्हाने आणि कोविड आधीची पिढी व कोविड संपल्यानंतरची पिढी यांना शिकविताना जाणवत असलेला फरक नमूद केला, तसेच पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढविली असल्याचे नमूद केले. तर सानिका कुलकर्णी यांनीही पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले व जनकवी पी. सावळाराम यांच्या नावाने असलेला पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्यासोबत स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश म्हस्के यांनीही सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. तसेच जनकवी पी. सावळाराम यांच्याबरोबर घालविलेले क्षण यांची आठवण करीत अनेक किस्से नमूद केले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपायुक्त उमेश बिरारी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर रंगाई निर्मित जनकवी पी. सावळाराम यांच्या गाण्यांवर आधारित 'धागा धागा अखंड विणूया' या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायिका केतकी भावे –जोशी, पल्लवी केळकर, डॉ. जय आजगांवकर यांनी पी. सावळाराम यांची 'ताई तू होणार नवरी.. सप्तपदी हे रोज चालते, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का.., मानसीचा चित्रकार तो' आदी गाणी सादर केली. या सांगितिक कार्यक्रमाचे निवेदन स्मिता गवाणकर यांनी केले तर संपूर्ण जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महानगरपालिकेची जाहिरात फी थकबाकीदारांवर कारवाई