प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या कोपरखैरणे, घणसोलीतील ७ पान शॉपवर छापे

हजारो रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा अन्न औषध प्रशासनाने केला जप्त

नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाची साठवणुक करुन त्याची विक्री करणाऱ्या पान शॉपची झाडाझडती सुरु केली आहे. त्यानुसार या पथकाने गत बुधवारी कोपरखैरणे आणि घणसोली भागातील सात पान शॉपवर छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच सातही पान शॉप सिल करुन सदर पान शॉप मालकांवर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

कोपरखैरणे व घणसोलीतील पान शॉपमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी हरदास व चिलवंते यांच्या पथकाने बुधवारी कोपरखैरणे सेक्टर- १४ मधिल मे. पंचरत्न पान शॉपसह, सेक्टर- १८ मधील चॅनेल टॉवरमध्ये असलेल्या मे गुप्ता जनरल अॅन्ड पान शॉप, सेक्टर- १९ मधील तीन टाकी जवळच्या शांती पॅलेस हॉटेललगत असलेल्या मे विशाल पान शॉप, त्याचप्रमाणे मे संजय पान शॉप, नित्यानंद हॉटेलजवळ असलेले मे बालाजी जनरल स्टोअर अॅन्ड टी स्टॉलवर छापा मारला. यावेळी या सर्व पान शॉपच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात गुटखा व प्रतिबंधीत असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा आढळून आला.

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुपारनंतर घणसोली सेक्टर- ५ मधील आयोध्या अपार्टमेंटमध्ये असलेल्या मे. मीना पांडेय पान शॉपवर, घणसोली रेल्वे स्टेशन समोर सेक्टर- ३ मध्ये नवरात्री हॉटेलजवळ असलेल्या मे मुन्ना पान शॉपवर छापा मारुन त्या पान शॉपची तपासणी केली असता, सदर पान शॉपमध्ये देखील प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाला, सुगंधीत तंबाखुचा साठा आढळुन आला. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सदर पान शॉप सापडलेला गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त करुन सातही पॉन शॉप सिल केले.

त्यांनतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थाच विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या पान शॉप मालक दिन बंधु सुर्यमनी नाथ (३४), विनोद विजयशंकर गुप्ता (४८), बनारसी हिरालाल पासवान (४८), सहेंदर रामजनम चव्हान (४७), गजेंद्र पुलकीत शर्मा (४२), जयप्रकाश हरिश्चंद्र पांड्येय (५०) व राधेश्याम बालेप्रसाद मौर्या (३०) या सात पान शॉप मालकांवर ७९,१८८, २७२,३२८,२७३,३४, अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे येथील उद्यानामधील खेळण्यांची दुरवस्था