तुर्भे येथील उद्यानामधील खेळण्यांची दुरवस्था
१ वर्षापासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
तुर्भे : तुर्भे येथील आदर्श मैदान समोरील एका मोकळ्या भूखंडावरील उद्यानामधील खेळणी तुटली असल्याने मागील वर्षभरापासून लहान मुले-मुलींच्या आनंदावर विरंजण पडले आहे. या विषयी स्थानिक लोकप्रिनिधी किंवा तथाकथित समाजसेवक, प्रशासन यांना कोणतेही देणे-घेणे पडल्याचे चित्र दिसत येत नाही. केवळ निवडणुकीच्या वेळी मत मागायला दारावर १० वेळा घिरट्या घालणारे कोणत्या बिळात दडून बसले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया तुर्भे मधील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
‘सिडको'ने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना रहिवासी वस्तीमध्ये मोकळ्या जागा, मैदाने, उद्याने आदींची तरतूद करुन ठेवली आहे. तुर्भे विभागामध्ये माथाडी आणि लहान व्यापारी, दलाल आदींसाठी अल्प उत्पन्न गटातील घराचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये रहिवासी घराजवळ काही मोकळ्या भूखंडावर उद्याने, मैदाने निर्माण करण्यात आली आहेत. १ टाईप मध्ये आदर्श मैदानाच्या समोर मोकळ्या जागेवर अर्ध्या भागात उद्यान आणि अर्ध्या भागात मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवली आहेत. मागील एक वर्षापासून उद्यानातील खेळणी तुटल्यामुळे त्याचा मुलांना खेळण्याकरिता उपयोग होत नाही. या विषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही त्या तक्रारींची नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. इतर प्रभागांमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी जीवाचा आटापिटा करतात; परंतु येथील तथाकथित लोकप्रतिनिधी यासाठी विशेष काही करताना दिसत नाहीत, अशी जनतेची भावना आहे.
तुर्भे येथील नागरिक पाणी देयक, मालमत्ता कर अगदी वेळेवरती भरत असताना येथील स्थानिकांच्या नशिबी साधे सुसज्य एकही उद्यान तुर्भे परिसरात उपलब्ध करुन देण्यास प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना अपयश आले आहे. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी तुर्भे मधील नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी या विषयी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.