प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडे येथे राबविणार

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकांना घरे
 

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' ही योजना राबविण्यात येत असून सदरची योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. (Public private participation)  या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

यासाठी महापालिकेकडून वास्तुविशारद, पी.पी.पी एक्सपर्ट व ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझरी म्हणून 'क्रिसील' या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेकडून या प्रकल्पाचा व्यावसायिक व्यवहार्यता अहवाल सादर केल्यानंतर निविदा प्रक्रिया करुन ही योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी आढावा बैठक घेवून माहिती घेतली. क्रिसीलमार्फत सादर केलेल्या व्यावसायिक, व्यवहार्यता अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेतवडे येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 1441 लाभार्थी आहेत पैकी 1253 लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित 188 प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करुन सदनिका देय राहतील. सदर सदनिका  30 चौ.मी चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. सदरची कामाची निविदा पी.पी.पी. तत्वावर काढण्यात येणार असून जो निविदाकार 1441 सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह)  त्याचे स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल अशा विकासकासाची नियुक्ती करण्यात येईल, यामध्ये सदर विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. 'परवडणारी घरे' या योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लक्ष तर राज्यशासनामार्फत रुपये 1 लक्ष याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे.

या बैठकीमध्ये क्रिसीलमार्फत सदर योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या अनुषंगाने संबंधित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, विकासक नियुक्त करणे आदी कामे जलदगतीने पूर्ण करुन दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्षात या कामास सुरूवात होण्याच्या दृष्टीकोनातून सुनिश्चित नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त बांगर यांनी दिल्या.

सदर बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, कार्यकारी अभियंता मोहन कलाल तसेच क्रिसील या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मधील उद्यान घोटाळा विधानभवनात