नवी मुंबई मधील उद्यान घोटाळा विधानभवनात

दोषींवर कारवाई करण्याची  मंगेश लाड यांची मागणी

वाशी : गेल्या कोविड काळात ८ कोटी रुपयांच्या नवी मुंबई महापालिका उद्यान घोटाळ्यात आमदार सौ. मंदाताई ताई म्हात्रे यांनी आरोपांची राळ उठवली होती. या प्रकरणी तीन महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता परत असाच १४ कोटी रुपयांचा उद्यान घोटाळा केल्याचा आरोप होत असून, याबाबत राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. त्याअनुषंगाने १८ डिसेंबर २०२३ रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना संक्षिप्त माहिती देण्यासाठी पाचारण केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईतील उद्यान घोटाळा राज्य विधीमंडळ अधिवेशनात गाजणार आहे.

कोविड काळात नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने काम न करताच आठ कोटींची बिले लाटल्याचा आरोप उद्यान विभागवार झाला होता. त्यानंतर सदर उद्यान घोटाळा चांगलाच गाजला होता. त्याचे पडसाद विधानभवनात उलटले होते.याची दखल घेत तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी या तिघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. काही महिन्यानी या अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता परत एकदा काम न करताच बिले अदा करुन असाच आणखी एक १४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप  महापालिका उद्यान विभागावर करण्यात आला आहे. सदर मुद्दा आता सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आला असून याबाबत तारांकित  प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी सदर मुद्दा विधीमंडळ सभागृहाच्या कामकाजात चर्चेला येणार असून, या सोबत नेरुळ सेक्टर-१६ मधील अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना संक्षिप्त माहिती देण्यासाठी १८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने केलेल्या पराक्रमामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नागपूर वारी घडणार  आहे.

उद्यान विभागातील गैरव्यवहार प्रकरणी आयुक्तांकडून मागविलेली माहिती
- महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांची माहिती
- कंत्रादारांकडून किती उद्यानांची देखभाल, दुरुस्तीची कामे केली जातात
- राबवण्यात आलेल्या निविदा प्रकियेची सविस्तर माहिती
- १४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला नसल्याबाबतचे सर्व पुरावे किंवा आता पर्यंत कंत्राटदारास अदा केलेल्या रक्कमांची माहिती
- कंत्राटदारास बिले अदा करण्यासंदर्भात अवलंबण्यात येणारी प्रकिया.
८ कोटी नंतर नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा उद्यान विभागात १४ कोटींचा घोटाळा?

दोषींवर कारवाई करण्याची  मंगेश लाड यांची मागणी
नवी मुंबई शहरात कोविड काळात काम न करता ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. यात तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिका उद्यान विभागात कामगारांच्या नावे ठेकेदारांनी १४ कोटी रुपये लाटले असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी कामगार नेते मंगेश लाड यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिका उद्यान विभागात २१ जून २०२१ पासून आजपर्यन्त दरमहा साधारण  ५० लाख रुपये बेलापुर ते दिघा कार्यक्षेत्रातील उद्यान देखभाल- दुरुस्ती आणि संवर्धनाच्या नावाखाली मागील २७ महिन्यांच्या कालावधीत १४ ते १५ कोटी रुपये इतकी रवकम अपहार करुन उद्यान विभागातील अधिकारी आणि संबधित ठेकेदार यांनी काम न करता संगमताने लाटली आहे.त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या या कृतींमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आपण फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी  मागणी कामगार नेते मंगेश लाड यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

संपूर्ण प्रकरण
 नवी मुंबई शहरातील सर्व उद्यानांची देखभाल, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे महापलिकेच्या स्थापनेपासून विविध ठेकेदारांकडून घ्ोण्यात येत आहेत. १ मे २०२० पूर्वी सदर सर्व कामे साधारण २० तथाकथित ठेकेदारांमार्फत मनुष्यबळ मानक या आधारे करण्यात येत होती. मात्र, १ मे २०२० रोजी पासून संपूर्ण नवी मुंबई शहरात २ ठेकेदार या धर्तीवर एन. के. शाह आणि हिरावती एन्टरप्रायझेस या ठेकेदारांना सर्वसमावेशक ठेकेदार म्हणून नेमण्यात आले. या ठेकेदारांना उद्यानातील सर्व कामे म्हणजेच विद्युत, स्थापत्य, ओपन जीम, सुरक्षा रक्षक आणि उद्यान देखभाल, दुरुस्ती आदी कामे देण्यात आली. एन. के. शाह आणि हिरावती एन्टरप्रायझेस या ठेकेदारांनी महापालिका उद्यान अधिकाऱ्यांना हाताशी धरुन साधारण ८ कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणून सदर दोन्ही ठेकेदारांना महापालिकेने निलंबित केले. त्याचवेळी महापालिकेच्या तीन उद्यान अधिकाऱ्यांची चौकशी लावून चंद्रकांत तायडे, भालचंद्र गवळी आणि प्रकाश गिरी यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. (सदर संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट असून चौकशी सुरु आहे.)

निविदेतील अटी शर्ती प्रमाणे एका कर्मचाऱ्याने २००० चौरस मिटर क्षेत्रफळ उद्यान देखभाल दुरुस्ती करायची असते. त्यामुळे क्षेत्रफळानुसार कामगार नेमणे आवश्यक असताना ठेकेदारांनी कामासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कामगार वापरले आहेत. तसेच काम न करता दरमहा लाखों रुपयांचे देयक महापालिका अधिकाऱ्यांच्या संगमताने लाटले आहेत, असा आरोप मंगेश लाड यांनी केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आज ठाण्यातील काही भागात पाणी नाही