बदली रद्द करण्यासाठी उद्यान अधिकाऱ्यांच्या नाना क्लृप्त्या?
आदेश निघून ६ दिवस उलटले तरी अधिकारी त्याच जागेवर
वाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनामध्ये वर्षानुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या उद्यान अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदल्या केल्या आहेत. मात्र, सदर बदली आदेश निघून सहा दिवस उलटले तरी या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला नाही तर बदली आदेश रद्द करण्यासाठी काही अधिकारी नाना क्लृप्त्या करीत असून, त्यांनी थेट नागपूर पर्यंत संपर्क साधला असल्याची चर्चा नवी मुंबई महापालिका वर्तुळात सुरु आहे.
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागात आकृती बंधमधील मंजूर पदांकडे डोळेझाक करुन काही उद्यान अधिकारी दुभत्या खात्यात ठाण मांडून बसले होते. ८ कोटींच्या उद्यान घोटाळ्यातील चौकशीत या अधिकाऱ्यांना काही नेत्यांनी अभय मिळवून दिल्याने ते पुन्हा त्याच जागी परतले. मात्र, आता ८ डिसेंबर रोजी या अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदल्या केल्या असून, अधिकारी बदली रद्द करण्यासाठी नेत्यांच्या दारी खेटे घालत आहेत. कंत्राटदारांना हाताशी धरुन नेत्यांशी संधान बांधून बदली थांबवा, असे साकडे बदली झालेले उद्यान अधिकारी घालत आहेत.या उद्यान अधिकाऱ्यांनी लावलेलं मलिद्याचे झाड बदली झाल्यावर दुसऱ्याच्या अंगणात जाणार मग त्यावर आपला हक्क राहणार नाही, म्हणून सदर अधिकारी नेत्यांच्या दरबारात बदली रद्द करण्याची शिफारस करावी अशी आर्जव करत असल्याचे समजते.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सरसकट सगळ्या उद्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, या बदलीत दोन अधिकाऱ्यांना नवीन झाड लावण्यास उशीर होईल आणि मर्जीतील कंत्राटदार नेत्यांना गोमटी फळ चाखायला मिळणार नसल्याने व्हाया ऐरोली शिफारस घेऊन सदर अधिकारी ठाणे-बेलापूर रस्त्यावर बदली रद्द करण्याचा प्रस्ताव घेऊन गेल्याची माहिती समोर येत आहे. तर यापूर्वी कामगार संघटनेच्या मदतीने उद्यान घोटाळ्यात या अधिकाऱ्यांनी निलंबन रद्द करण्यासाठी साकड घातले होते. आता बदली रद्द करण्यासाठी सदर अधिकारी थेट याच कामगार नेत्याच्या माध्यमातुन नागपूर मधून नाना क्लृप्त्या लढवत आहेत. दुसरीकडे राजकीय दबावाला महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर देखील बळी पडत असून त्यांनी या बदल्या रोखून ठेवल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागात काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे. याबाबत आम्ही महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे रद्द करता यावे म्हणूनच सदर अधिकारी बदली रद्द करण्यासाठी जोर लावत असावेत. मात्र, महापालिका आयुक्तांनी काढलेल्या बदली आदेशाची अंमबजावणी नाही झाली तर आम्ही आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहोत. - मंगेश लाड, सरचिटणीस - समाज समता कामगार संघ, नवी मुंबई.
नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांना जुना पदभार सोडण्यास खुद्द महापालिका आयुक्तांनी रोखले असेल तर या उद्यान अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला महापालिका आयुक्तांचाच पाठिंबा असल्याचे दर्शवतो. - देवेन आठल्ये, समाजसेवक - नवी मुंबई.
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागातील बदली केलेल्या अधिकाऱ्यांना एक दिवस उशिरा पदमुक्त करा असे आम्ही तोंडी आदेश दिले होते. मात्र, १३ डिसेंबर रोजी सायंकाळपासून सदर अधिकारी आपला पदभार स्वीकारतील. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.