वाशी मध्ये कापडी पिशवी वेंडींग मशीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते कार्यान्वित
महापालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक संदेशाचा प्रचार
नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहरासाठी एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांसोबत कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात असताना १२ डिसेंबर रोजी वाशी सेक्टर-१७ मधील महाराजा भाजी आणि फळ मार्केट येथे सीएसआर उपक्रमांतर्गत कापडी पिशवी वेंडींग मशीन सुविधेचे लोकार्पण नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वाशी विभाग अधिकारी सागर मोरे, कार्यकारी अभियंता अजय संखे, माजी नगरसेवक संपत शेवाळे आणि इतर महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल नेटवर्कच्या सीएसआर उपक्रमामधून कापडी पिशवी वेंडिंग मशीन मार्केटच्या ठिकाणी बसविण्यात आली असून, वेंडिंग मशीनमध्ये १० रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनवरील लाल बटण दाबल्यावर त्यामधील ॲटोमॅटीक प्रणालीव्दारे कापडी पिशवी दिली जाते. साधारणतः ५ ते ६ किलो वजन पेलू शकेल अशा क्षमतेची सदर कापडी पिशवी असून, जर navimumbaicity.com ॲप मोबाईलमध्ये मोफत डाऊनलोड करुन घेतल्यास ॲपमधील कोड स्कॅन केल्यानंतर मशीनव्दारे मोफत कापडी पिशवी प्राप्त होते
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १० रुपयाचे नाणे टाकून तसेच ५ रुपयाची दोन नाणी टाकून त्याचप्रमाणे ॲपव्दारे कोड स्कॅन करुन प्रत्यक्ष पिशवी प्राप्त करुन घ्ोतानाच या मशीनची कार्यप्रणाली जाणून घेतली. ‘नवी मुंबई सिटी डॉट कॉम सोशल नेटवर्क' तर्फे संस्थापक मेहुल जैन, सह संस्थापक पुजा पवार आणि श्रुती कांबळे यांनी मशीनच्या कार्यपध्दतीची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिली.
मशीनमधून मिळणाऱ्या कापडी पिशव्यांवर यापुढील काळात संस्थेच्या कामांचा आणि नवी मुंबई महापालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक संदेशाचा प्रचार करण्यात येईल, असे संयोजकांनी सांगितले. आगामी कालावधीत इतरही मार्केटमध्ये कापडी पिशव्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही सांगण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील विक्रेत्यांशी संवाद साधत सदर मार्केट एकल वापर प्लास्टिक पिशवीमुक्त ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून ग्राहकांनी कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत आग्रही असावे, असे आवाहन केले. ग्राहकांनी सोबत कापडी पिशवी आणली नसेल तर त्यांना तेथील वेंडिंग मशीनचा वापर करुन कापडी पिशवी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे विक्रेत्यांना सांगतानाच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नागरिकांशीही संवाद साधत त्यांना कापडी पिशव्यांचा वापर निग्रहपूर्वक करावा असे आवाहन केले.