नवी मुंबई महापालिकेची डिजीटलायझेशनच्या दिशेने वाटचाल

नागरिकांना अपेक्षित गतीमान सेवापूर्तीसाठी कार्यतत्पर राहण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश  

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये परस्पर समन्वय राहावा आणि नागरिकांना महापालिकेशी संबंधित सेवा विहित कालावधीत, कमीत कमी श्रमात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन इआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही जलद पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी अधिक काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, महापालिका प्रशासन आणि नागरिक या दोघांच्या दृष्टीने ‘इआरपी'ची नवी प्रणाली लाभदायक असून नवी मुंबई महापालिकेने डिजीटलायझेशनच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे.

विविध विभागांतील कामांचा आढावा घेताना आयुक्त नार्वेकर यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत इआरपी प्रणालीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच विभागांचा प्राधान्यक्रम ठरवून काम पूर्ण होईल तसतशा त्या त्या विभागांच्या सेवा कार्यान्वित करण्यास सुचविले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीवेळी इआरपी प्रणालीत उपलब्ध सुविधांची आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पाहणी करीत काही सेवा उपलब्धतेची कार्यवाही जाणून घेतली. सध्याची कार्यान्वित इआरपी प्रणाली अद्ययावत केली जात असून यामुळे मुख्यालय आणि विभाग कार्यालयांसह इतर विभाग यांच्याकरिता एकच सॉपटवेअर वापरले जाईल. त्याने सर्व विभागांच्या कामकाजात एकसुत्रता येईल. या सोबतच ‘लिडार सर्वेक्षण'चा आढावा घेताना आयुक्त नार्वेकर यांनी मालमत्ताकर विभागाने सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, ‘विकसीत भारत संकल्प यात्रा'चे नवी मुंबई महापालिका क्षेत्रासाठीचे वेळापत्रक येणार असल्याचे गृहीत धरुन महापालिका क्षेत्रातील विभागनिहाय जागा निवडून ठेवाव्यात. नागरिकांना अपेक्षित गतीमान आणि दर्जेदार सेवा-सुविधापूर्तीकरिता काम करणे अपेक्षित असून त्यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य घेऊन नियोजनबध्द काम करावे, असेही आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले.

‘उद्यानांचे शहर' अशी देखील नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून उद्यानांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा. तसेच खेळणी दुरुस्तीसोबतच टॉय ट्रेन सुरु करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. उद्यानांच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक बाबींची उद्याननिहाय विभागवार सूची करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. त्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक घेण्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्वच्छता नवी मुंबईची ओळख असून यामध्ये अधिकाधिक सुधारणा करत राहणे, आपले उद्दीष्ट आहे. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान या अनुषंगाने विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांपासून प्रत्येक घटकाने आपापली कामे सतर्कतेने करावयाची असून शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावयाचे आहे. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जबाबदारी निश्चित केली जाईल. - राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्रामपंचायत स्थापनोपूर्वीचे घर अनधिकृत ठरवून भूखंड विक्री