पनवेल महापालिकेची पहिली भरती परीक्षा विना तक्रार संपन्न
महापालिका आयुवत गणेश देशमुख यांच्याकडून संबंधितांचे अभिनंदन
पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनामध्ये ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी पहिली ऑनलाईन भरती परीक्षा आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उत्तम नियोजनामुळे सुरळीतपणे संपन्न झाली. ८ ते ११ डिसेंबर या कार्यकाळात झालेली सदर भरती परीक्षा महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील ५७ केंद्रावर व्यवस्थितरित्या संपन्न झाली.
पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. या महापालिकेसाठी आकृतीबंधानुसार एकूण १०४३ पदे मंजूर झाली होती. यामधील भरती प्रक्रियेमध्ये सरळसेवेच्या ४१ संवर्गातील ३७७ पदे भरण्याकरिता टीसीएसच्या माध्यमातून पहिलीच परीक्षा घेण्यात आली. महापालिकेच्या विविध ४१ संवर्गाकरिता झालेल्या या परीक्षेसाठी एकूण ५५,२१४ पात्र अर्ज प्राप्त झाले होते. ८ ते ११ डिसेंबर या दरम्यान तीन सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्याच्या सहा विभागातील २१ जिल्ह्यांमध्ये एकूण ५७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.
पनवेल महापालिकेच्या भरती परीक्षा विना तक्रार पार पाडण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका मुख्यालय येथे कंट्रोल रुम तयार करण्यात आला होता. त्यामध्ये टीसीएस कंपनींचे प्रतिनिधी, विभागीय समन्वयक तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी चार दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यत कार्यालयात कार्यरत होते.
परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण महापालिका मुख्यालयातील कंट्रोल रुममधून करण्यात आले. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, मोबाईल जॅमर, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, आदि सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. सदर भरती परीक्षेसाठी ५७ परीक्षा केंद्रावर ८ डिसेंबर रोजी ७७.६१ टक्के, ९ डिसेंबर रोजी ७५.६० टक्के, १० डिसेंबर रोजी ७७.४९ टक्के, ११ डिसेंबर रोजी ७८.१५ टक्के उमेदवारांची उपस्थिती राहिली. परीक्षेच्या या चार दिवसांमध्ये एकूण ५५,२१४ उमेदवारांपैकी ४२,८३२ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहिले.
दरम्यान, आयुक्त गणेश देशमुख यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली नियोजित केलेल्या चार दिवसांमध्ये सदर भरती परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून भरती परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.
भरती परीक्षेसाठी पनवेल महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी चार दिवसापासून रात्रंदिवस अव्याहतपणे कष्ट घेतले. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयातील कंट्रोल रुममध्ये सर्व समन्वयक, प्रत्येक ५७ परीक्षा केंद्रावरील केंद्र समन्वयक अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व जिल्हा समन्वयक अधिकारी, महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच सर्वांच्या वतीने सहा विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहिलेले उपायुक्त सचिन पवार, उपसंचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त गणेश शेटे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे तसेच आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, विभाग प्रमुख नामदेव पिचड त्याचप्रमाणे तसेच टीसीएस कंपनी प्रतिनिधी अभिषेक कदम, जॅमरच्या इसीआयएल कंपनीचे राम नारायण मालविया या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.