मेट्रो रेल्वेचे खांब आणि शहरातील वाहतूक बेटे यावर फलकबाजी केल्यास महापालिका करणार दंडात्मक कारवाई

महापालिका क्षेत्रात दर बुधवारी फलक सफाई मोहीम

ठाणे  : ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रके, फलक, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. हे फलक चिकटवून शहर विद्रुपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

 दर बुधवारी फलक सफाई मोहीम

त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात दर बुधवारी अनधिकृत फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवावी. या मोहिमेत सर्व अनधिकृत फलक काढले जातील याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

 वाहतूक बेटांवर फलक, होर्डिंग्ज नकोत

 तसेच, वाहतूक परीचलनाच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या शहरातील वाहतूक बेटांवर सर्व बाजूंनी फलक लावण्यात आल्याचे सर्वत्र दिसते. या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच, शहर विद्रूप दिसते. त्यामुळे, या वाहतूक बेटांवर कोणत्याही स्थितीत फलक, होर्डिंग्ज लागणार नाहीत याची दक्षता सर्व सहायक आयुक्त यांनी घ्यावी, असे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

मेट्रोच्या खांबावर चिकटवण्यात आलेल्या जाहिरातींमुळे शहरभर खराब चित्र निर्माण होते. शहर सुशोभीकरण करून ठाण्याचे रूप बदलण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यात, मेट्रोच्या खांबांवर लावण्यात आलेल्या फलकांमुळे समस्या निर्माण होत आहे. मेट्रोचे खांब रंगवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच, मेट्रो खालील भागात उद्यान, आसन व्यवस्था, सुशोभीकरण यांची कामे सुरू झालेली आहेत. अशावेळी, फलक चिकटवले किंवा होर्डिंग्ज लावले तर ते चित्र विद्रूप दिसते आहे. त्यामुळे, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात येत असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

या फलकांबाबत, महापालिका मेट्रो व्यवस्थापनाशी पत्र व्यवहार करीत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठकीचेही लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. मेट्रोच्या मालमत्तेवरील अनधिकृत फलक, होर्डिंग्ज काढण्यासाठी त्यांनी एखाद्या संस्थेची नेमणूक करावी. त्यांच्यासोबत महापालिकेची यंत्रणा काम करेल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

आठवड्यातून एक दिवस संपूर्ण महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, होर्डिंग्ज सफाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. विविध ठिकाणी असे फलक लावल्याने शहर विद्रूप होते. त्यामुळे ही मोहीम आवश्यक असल्याचे आयुक्त बांगर म्हणाले. दंड आकारणी आणि फलक परवानगी याबाबत महानगरपालिकेचे धोरण ठरलेले आहे. त्याची ठोस अमलबजावणी करण्यात यावी, असेही आयुक्त  बांगर यांनी स्पष्ट केले.

 या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) गजानन गोदेपूरे, परिमंडळ एकचे उपायुक्त मनीष जोशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ तीनचे उपायुक्त दिनेश तायडे उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाला संपन्न