पनवेल मध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे उत्साहात स्वागत

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना मिळणार लाभ

पनवेल : शासनाच्या विविध योजना या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्यासाठी राबविल्या जातात. परंतु, या योजना केवळ कागदावरच न राहता सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था आणि महिला बचत गट यांची प्रमुख भूमिका असणार आहे. नागरिकांनी देखील याबबत अधिक सतर्क राहून या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. या योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे पनवेल शहरामध्ये उत्साहात आगमन झाले. आयुक्त गणेश देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी पनवेल मधील छत्रपती शिवाजी  महाराज चौकामध्ये या यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, जिल्हा समन्वयक प्रसाद कुलकर्णी, कैलास शिंदे ,माजी नगरसेवक अनिल भगत, चारुशिला घरत, नितीन पाटील, विभाग प्रमुख मनोज चव्हाण , प्रभाग अधिकारी रोशन माळी तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनातर्फे शहरी भागातील नागरिकांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध १७ योजनांची परिपूर्ण माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, असा ‘संकल्प यात्रा'चा प्रमुख उद्देश आहे. सदर योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच नागरिक आणि प्रशासन यामध्ये योजनांबाबत सुसंवाद घडवून आणणे यासाठी यात्रा दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी उत्कृष्ट पध्दतीने नियोजन केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला सुमारे ८ ते १० हजार नागरिकांनी भेट दिली. ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चा १० डिसेंबर रोजी पनवेल बस स्थानक आणि खांदा कॉलनी येथे दुसरा दिवस संपन्न झाला. यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. सुरेश पंडीत, समाजसेवक जगदीश घरत यांच्यासह महापालिकेचे सर्व वैद्यकिय अधिकारी, एएनएम, जीएनएम, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमास महापालिकेच्या वतीने वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत स्वास्थ कार्ड योजना यांची माहिती देणारी दालने उभारण्यात आली होती. या दालनांच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत स्वास्थ कार्ड काढले नाहीत, अशा नागरिकांना यावेळी तात्काळ त्यांचे आयुष्यमान भारत स्वास्थ कार्ड काढून देण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मेट्रो रेल्वेचे खांब आणि शहरातील वाहतूक बेटे यावर फलकबाजी केल्यास महापालिका करणार दंडात्मक कारवाई