आता ‘एनएमएमटी'मध्ये मोबाईल वापरावर निर्बंध

बसमध्ये मोठ्याा आवाजात ऑडिओ-व्हिडीओ ऐकण्यास, बघण्यास मनाई

नवी मुंबई : बेस्ट पाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने देखील एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. आपल्या शेजारच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे एनएमएमटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एनएमएमटी प्रशासनाने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

 सार्वजनिक उपक्रमांच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे सार्वजनिक उपक्रमांच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना त्याचा त्रास होतो. दरम्यान, नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात. त्यांच्याकडून त्याचा मुक्तपणे वापर करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईल फोनवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत बघत असतात. स्मार्ट फोन चालकांच्या आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.  
त्यामुळे प्रवाशांमध्ये वाद-विवादाचे प्रकार होऊ लागल्याने नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने देखील आपल्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी नुकतेच जारी केले आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) सेवा सार्वजनिक परिवहन सेवा असल्याचे आणि एनएमएमटी बस मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होवू नये, याकरिता मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८/१,२ आणि ११२) सदर प्रवाशावर कारवाई होवू शकते, असे या आदेशात म्हटले आहे.  

तसेच एनएमएमटी परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे सदर आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परिवहन उपक्रमातील सर्व चालक, वाहन आणि पर्यवेक्षकीय कार्मचारी यांनी याची नोंद घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.  

एनएमएमटी उपक्रमाच्या तापयात जवळपास ५६७ बसेस असून त्या ७४ मार्गावर रोज प्रवासी वाहतूक करीत आहेत. यामध्ये मुंबईतील मंत्रालय, दादर, बांद्रा, बोरीवली, मुलुंड, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, बदलापूर, कर्जत, रसायनी उरण, तळोजा या भागांचा समावेश आहे. ‘एनएमएमटी'च्या बसेसमधून दररोज १ लाख ८० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे उत्साहात स्वागत