वाशी मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रिडांगणाची दुरवस्था

महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराविषयी संताप

तुर्भे : नवी मुंबई महापालिका मार्फत नवी मुंबई शहरातील खेळाच्या मैदानांची देखभाल दुरुस्ती नेहमीच केली जाते. परंतु, काही ठिकाणी या संदर्भात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वाशी सेक्टर-१ मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रिडांगणाची पुष्कळ प्रमाणात दुरवस्था झाल्याने खेळाडूंकडून श संताप व्यक्त केला जात आहे.

‘सिडको'ने नवी मुंबई शहर वसवताना रहिवासी वस्ती लगत उद्याने आणि मैदाने, मोकळ्या जागा या शहराचा श्वास असल्याने त्या ठिकठिकाणी प्रत्येक नोड मध्ये आरक्षित करुन ठेवल्या आहेत. वाशी सेक्टर-१ आणि सेवटर-२ या परिसरातील रहिवाशांकरीता वाशी सेक्टर-१ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस खेळाचे मैदान आहे. या मैदानाच्या संरक्षण भिंतीची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी संरक्षण भिंत फुटली आहे. तसेच काही ठिकाणी केवळ दोन ते अडीच फुटाची संरक्षक ग्रिल असल्याने त्यावरुन उड्या मारुन भटकी कुत्री, जनावरे या मैदानामध्ये फिरताना दिसतात. याशिवाय मैदानाची नियमितपणे साफसफाई न केल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचे चित्र दिसते.

महापालिका उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान जणू काही भंगार सामान ठेवण्याची जागाच बनले आहे. सध्या विद्युत विभागाचे विजेचे जुने खांब या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेले आहेत. मैदानातील पावसाळी पाणी वाहून नेण्याचे गटारही अनेक ठिकाणी तुटले आहे. तसेच या गटारामध्ये पुष्कळ प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात मैदानामध्ये पाणी साचण्याचा प्रकार होतो. मैदानामध्ये बसवण्यात आलेली बाके तुटलेल्या स्थितीमध्ये आहेत. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानातील गवतही नियमितपणे काढले जात नाही. त्यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान मध्ये विविध खेळ खेळण्याकरिता जागा आखून देण्यात यावी, अशी मागणी खेळाडूंकडून केली जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई महानगर क्षेत्रात डॉक्टराने ३०० रोबोटिक नी-रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची पहिलीच वेळ