विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन

ठाणे महानगरपालिका, आदित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन

 ठाणे : व्यंगत्वावर मात करीत आपल्यातील कलागुण सादर करीत विशेष मुलांनी उपस्थित रसिकांनाही त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला. निमित्त होते (3 डिसेंबर) या जागतिक दिव्यांग दिनाचे. ठाणे महानगरपालिका, आदित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिव्यांग दिनाचे आज आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील तसेच ठाणे महापालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुले सहभागी झाली होती.  यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी,  समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, दिव्यांग कला केंद्राचे किरण नाकती आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन सर्व उपस्थित विशेष मुले, त्यांचे शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.

या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत '' अरेरे.. ते अरेवा '' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले, स्वागतगीतांसाठी संगीत शिक्षिका ऐश्वर्या नारकर यांनी मुलांना हार्मोनियमवर साथसंगत केली. अथर्वशीर्ष सादर करणाऱ्या मुलाचे विशेष कौतुक यावेळी रसिकांनी केले. इतर मुलांप्रमाणे या विशेष मुलांनी सादर केलेले एकापेक्षा एक अविष्कारानी रसिकांना भुरळ पाडली.

या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली. सूर निरागस हो.., शुभंकरोती म्हणा.. सत्यम शिवम सुंदरम, अशी एकापेक्षा एक गाणी मुलांनी सादर केली तर चला जेजुरीला जावू…, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अशा एका पेक्षा एक बहारदार नृत्यावर आदित्य प्रतिष्ठानच्या विशेष मुलांनी ठेका धरला. महाराष्ट्र ही संतांची..तंतांची भूमी असून आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन वेशभूषेच्या माध्यमातून मुलांनी घडविले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन आदित्य प्रतिष्ठानचे किरण नाक्ती यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विचारवंत दिलीप मंडल यांनी व्याख्यानातून उभे केले राष्ट्रनिर्माते बाबासाहेब