‘कोळी महासंघ'च्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन संपन्न

कोळी समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी महासंघ सज्ज -आ. रमेश पाटील

नवी मुंबई : कोळी महासंघ राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करुन राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असल्याची माहिती ‘कोळी महासंघ'चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी राज्यातील दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिली.

‘कोळी महासंघ'ची लोणावळा येथे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. राज्याच्या ३० जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या महसूल विभागाप्रमाणे वर्गवारी करुन पाच विभागातील संपर्कप्रमुख आणि लोकसभा, विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्ती आणि कार्याचा आढावा घेण्यासाठी लोणावळा येथे दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करुन कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा कार्यशाळेत घेण्यात आला. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या महसुली विभागामध्ये संपर्कप्रमुख आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा, समाजाभिमुख संपर्क यावर भर देण्यात आला.

कार्यशाळा यशस्वी पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण येत्या सहा महिन्यात कोळी समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आराखडा निश्चित करणार असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

अनुसूचित जमातीचे दाखले आपला खरा केंद्रबिंदू आहे. कोळी जमात अनुसूचित जमातीमध्ये असताना देखील त्याचे लाभ सुलभरित्या मिळू नये म्हणून उभ्या राहिलेल्या यंत्रणेला धक्का देण्यासाठी राजकीय एकजूट दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यप्रणाली अवलंबणार असल्याचे सांगून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘कोळी महासं'च्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आ. रमेश पाटील यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी ‘कोळी महासंघ'चे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवानंद भोईर, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील, अरुण लोणारे, प्रा. सुरेश पाटकर, शिवशंकर फुले, सतीश धडे, प्रा. अभय पाटील, रामभाऊ कोळी, रामदास कोळी आदिंनी दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा अहवाल अवगत करुन घेतला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महापरिनिर्वाण दिनी ऐरोली येथील डॉ. आंबेडकर स्मारकस्थळी भेटीचे आवाहन