‘अंनिस' आयोजित शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेत स्नेहा घाटे प्रथम

अंधश्रध्दा विरोधात विद्यार्थी दशेतच वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब महत्वाचा -मुक्ता दाभोलकर

नवी मुंबई : भूत भानामती, मंत्र तंत्र, अंगात येणे सारख्या अंधश्रध्दा बाजुला सारण्यासाठी विद्यार्थी दशेतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘अंधश्रध्दा निर्मुलन समिती'च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी नेरुळ येथे केले.

‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती'च्या बेलापूर आणि नेरुळ शाखेच्या वतीने शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच नेरुळ येथील शिरवणे विद्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती'च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधताना मुक्ता
दाभोलकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखादी घटना अथवा चमत्कार यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्यामागील कार्यकारणभाव शोधणे असल्याचे स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती'च्या बेलापूर आणि नेरुळ शाखा विविध उपक्रमांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार-प्रसार करण्याचे काम करते. याच हेतुने ‘अंनिस' प्रामुख्याने किशोरवयीन मुला-मुलींसाठी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचा एक प्रमुख उपक्रम गेली पाच वर्षे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. २०१८ साली सुरु झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेंट्रल स्कूल, बेलापूर येथे घेण्यात आली.

या स्पर्धेत नेरुळ येथील शिरवणे विद्यालयाची स्नेहा घाटे हिचा प्रथम क्रमांक आला. तर रा. फ. नाईक विद्यालयाची मैथिली नाईक आणि ज्ञानदीप सेवा मंडळाच्या लक्ष्मी कडेकर या विद्यार्थिनींचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. विद्या भवन सेकंडरी मराठी माध्यम शाळेतील भक्ती गावडे, रा. फ. नाईक विद्यालयाची सिध्दी गोरे यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विजेत्यांना ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती' बेलापूर आणि नेरुळ शाखा तर्फे प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे प्रमाणपत्र आणि ‘अंधश्रध्दा निर्मुलन'ची पुस्तके मुक्ता दाभोलकर आणि शिरवणे शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते भेट देण्यात आली. या प्रसंगी राज्यभरातील विविध वक्तृत्व स्पर्धात उज्वल यश मिळवणारा विवेक वारभुवन याचा मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर पवार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश साळुंखे यांनी तर प्रास्ताविक रेखा देशपांडे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘कोळी महासंघ'च्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन संपन्न