नोटीसा मिळालेल्या दुकानदारांनी बदलले नामफलक

पनवेल महापालिका द्वारे १६४१ दुकांनाना नोटीस

पनवेल : गेल्या दोन आठवड्यापासून पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिका प्रशासनाद्वारे प्रभाग अ,ब,क,ड या चारही प्रभागांमध्ये १६४१ दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची ठिकाणे यांचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये करावा यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेने दिलेल्या या नोटीसांचा प्रभाव सर्वत्र दिसू लागला आहे. चारही महापालिका प्रभागातील दुकानदार, आस्थापनांनी  तातडीने आपले नामफलक बदलल्याचे चित्र दिसत आहे. चारही महापालिका प्रभागात मोठ्या प्रमाणात दुकाने आणि आस्थांपनांचे नामफलक मराठी भाषेत बनविल्याचे दिसून येत आहे.

 महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क' नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे यांचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिका हद्दीतील चारही प्रभागांमधील मराठी नामफलक नसलेल्या १६४१ दुकाने आणि आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात स्पीकरद्वारे अनाउन्समेंट देखील केली जात आहे. मराठीमध्ये नामफलक न लिहिलेल्या दुकानदारांना, आस्थापनांना कामगार विभागाच्या माध्यमातून दंड आकारण्यात येणार आहे.

२५ नोव्हेंबर पासून महापालिकेने नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु केली असून, महापालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना नामफलकाच्या नोटीसा देण्याबाबतचे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजी तसेच अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहीलेली जरी असली तरीही ती औपचारीकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहीलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठी (देवनागरी) लिपीत तर असावाच तसेच इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा असे नमूद आहे. त्यानुसार नोटीसा दिलेल्या दुकानदारांनी, आस्थापनांनी त्यांचे नामफलक बदलल्याचे चित्र चारही महापालिका प्रभागात दिसून येत आहे. आता दुकानांवरती मोठ्या अक्षरात मराठी भाषेतील नामफलक दिसत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अंनिस' आयोजित शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेत स्नेहा घाटे प्रथम