एक कोटीची पाणी पुरवठा योजना कोरडीच

पाण्याचा एक ही थेंब न आल्याने शासनाचे करोडो रुपये वाया

उरण : चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात आलेली एक कोटीची पाणी पुरवठा योजना कोरडीच पडली आहे. त्यामुळे सदर योजनेच्या ६ व्यासाच्या पाईपलाईन मधून पाण्याचा एकही थेंब न आल्याने शासनाचे करोडो रुपये वाया गेले असल्याची बाब समोर येत आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार मोठा असल्याने या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रमेश डाऊर यांनी शासनस्तरावर अनेक वेळा प्रयत्न केले. तसेच सदर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये करावे, अशी मागणी लावून धरली होती. आज प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन शुन्य कारभारामुळे चाणजे सारख्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. तत्कालीन आमदार मनोहर भोईर आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी शासनस्तरावर प्रयत्न करुन पाच वर्षांपूर्वी सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून बापदेवपाडा कासवळेपाडा कोंढीपाडा येथील रहिवाशांसाठी एक कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करुन घेतली.

‘सिडको'च्या हेटवणे जलवाहिनीतून द्रोणागिरी नोड या परिसरातून चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथे पाईपलाईन टाकण्याचे काम संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परंतु, पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन मधून पाण्याचा एकही थेंब रहिवाशांना न मिळाल्याने पाण्याचे संकट गडद बनले आहे. एकंदरीत योजनेवर खर्च केलेले शासनाचे करोडो रुपये वाया गेले आहेत.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना तसेच बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील पाणी पुरवठा योजना पुर्वरत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. -अमिताभ भगत, सरपंच - चाणजे ग्रुप ग्रामपंचायत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१४ डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा ‘लाक्षणिक बंद'चा इशारा