अतिक्रमित भूखंड अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र; प्रशासन ढीम्म?

कोपरीगाव, सेक्टर-२६ मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

वाशी : वाशी मधील एपीएमसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर स्थानिक भुमाफियांच्या आशीर्वादाने झोपडपट्टीसह अनधिकृत वाहनतळ आणि गॅरेज वसवले गेले आहे. मात्र, आता सदर ठिकाण अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनल्याचे पोलिसांच्या कारवाईवरुन स्पष्ट  होत आहे. मात्र, एपीएमसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवर आणि येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सिडको आणि नवी मुंबई महापालिका प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने कोपरीगाव, वाशी सेक्टर-२६ मधील रहिवासी हवालदिल झाले आहेत.

वाशी सेक्टर-१९ मधील मोकळ्या सिडको भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बेकादेशीर वाहनतळ, गॅरेज सुरु आहेत. मात्र, येथील अतिक्रमित वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. येथील वाढत्या झोपड्यांमुळे कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच रात्री रस्त्यावर देहविक्री, अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरु असतात. नुकतेच एपीएमसी पोलिसांनी या ठिकाणी दोन महिलांना ड्रग विक्री करताना पकडले आहे. तर याच ठिकाणी एका आठवड्यातील सदर तिसरी कारवाई ठरली आहे. तर दीड महिन्यापूर्वी अवैध झोपडी बांधण्यास अटकाव केला म्हणून महापालिका सुरक्षा रक्षकाला देखील धक्काबुक्की करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटना रोज घडत असल्याने कोपरी गाव, सेक्टर-२६ मधील रहिवासी आणि महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या विरोधात सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी महापालिका, सिडको तसेच मुख्यमंत्री दालनापर्यंत पाठपुरावा करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने रहिवाशांच्या ओंजळीत फक्त आश्वासनांची खैरात टाकली आहे. प्रत्यक्षात अजूनही या ठिकाणी ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस येथे अवैध व्यवसाय फोफावत चालला आहे. त्यामुळे सिडको आणि महापालिका प्रशासन येथील भूमाफियांच्या दबावाला बळी पडत आहे का?, असा सवाल या निमित्ताने कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे.

पुनीत कॉर्नर समोरील भुखंडावर असलेली झोपडपट्टी, अनधिकृत वाहनतळ आणि गॅरेजवर कारवाई करावी अशी मागणी सिडको, नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मात्र, ठोस कारवाई काही होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन दबावाखाली येऊन कोपरी गाव आणि सेक्टर-२६ मधील रहिवाशांच्या जीवाशी खेळत आहे का?, असा प्रश्न भेडसावत आहे. - संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई अधिष्ठान. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एक कोटीची पाणी पुरवठा योजना कोरडीच