‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचा शुभारंभ
आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेचे लघुउद्योजकांकडून स्वागत
ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाची आखणी केली असून नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ लघुउद्योजक क्षेत्रात काम करीत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेने करण्यात आला.
आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरु झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. सदरची प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करुन ती सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्यासोबतच नागरिकांची मतेही तसेच प्राधान्यक्रम जाणून घेण्याचीही गरज असते, म्हणून सदर चर्चेचा उपक्रम सुरु करीत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात लघुउद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाणे शहरात एविझबिशन सेंटर असणे आवश्यक असल्याचे माया वायंगणकर यांनी नमूद केले. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापारपेठा या छोट्या जागेत भरविल्या जातात, जर ठाण्यात एविझबिशन सेंटर निर्माण झाले तर सर्वच लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल, अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात वाशी मधील सिडको एविझबिशन सेंटरच्या धर्तीवर एविझबिशन सेंटरचे नियोजन केले जाईल आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली.
ठाणे शहराला ज्या १२० ई-बसेस मिळणार आहेत, त्या बसेस ठाणे शहरातच चालविण्यात याव्यात. जेणेकरुन शहरातील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल यावर विचार करण्यास एकनाथ सोनावणे यांनी सूचित केले. तसेच परिवहन सेवेच्या बसेसची संख्या वाढविली तर नागरिक स्वतःचे वाहन आणणार नाहीत. पण, त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ई-बसेस शहरात जास्तीत जास्त येतील या दृष्टीने प्रयत्न सुरु असून जानेवारीमध्ये जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावतील, असे आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले.
सोसायट्यांनी जर रुफटॉपवर सोलर पॅनल बसविले तर त्यांना मालमत्ता करात सवलत याबाबत पर्यावरणपूरक निर्णय घेण्याचा विचार सुरु असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.
ठाणे मधील नोकरी करणाऱ्या नागरिकांना भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघर आणि वृध्दांसाठी वृध्दाश्रम. जर पाळणाघर आणि वृध्दाश्रम एकत्रित करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यास या दोन्ही समस्या सुटतील. तसेच ठाणे महापालिका शाळांचे आधुनिकीकरण करणे, तसेच या मुलांना स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे, शाळाबाह्य मुलांना शिकविणे असे उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेने विचार करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. त्यावर पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त आहे. त्यामुळे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या तसेच सीबीएससी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न असून सद्यस्थितीत असलेल्या महापालिका शाळांचा दर्जा वाढविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
ठाणे शहरातील पार्किंगची समस्याही बिकट असून दिवसेंदिवस सदर समस्या वाढणार आहे. यासाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उपलब्ध करणे, उपवन, शिवाईनगर येथे नाना-नानी पार्क, काही स्मशानभूमींमध्ये असलेल्या गैरसोयी दूर करुन नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करणे, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.
सदर चर्चासत्रात ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशन'चे उपाध्यक्ष भावेश मारु, कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे, टीसा आणि कोसियाचे सदस्य सचिन म्हात्रे, ‘टीसा'चे सदस्य राजेंद्र आफळे, राघवेंद्र कोल्हटकर, माया वायंगणकर, निखिल सुळे, आदि सहभागी झाले होते.
ठाणे महापालिका प्रशासन नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी कटीबध्द तर आहेच; पण शहराचा नागरिक म्हणून देखील प्रत्येकाने स्वयंशिस्तीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांकडून जे मुद्दे समोर येतील त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाईल. तसेच काही बाबींची उकल राज्य शासनाच्या माध्यमातून होणे आवश्यक असेल तर तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका.