तुर्भे गावातील ‘सिडको'च्या भूखंडावर भूमाफियांकडून बांधकामाला सुरुवात
महापालिका, सिडको प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष
तुर्भे : तुर्भे गावातील ‘सिडको'च्या मोकळ्या भूखंडावर भूमाफियांकडून अनधिकृतरीत्या बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी मागील महिन्यात नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाकडे तक्रार आल्याने सदर बांधकाम थांबवण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा सदर बांधकाम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सिडको आणि नवी मुंबई महापालिका काय भूमिका घेते?, याकडे तुर्भे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तुर्भे गावांमध्ये नवी मुंबई महापालिका मासळी मार्केटच्या पाठीमागील बाजूस ‘सिडको'चे तीन मोकळे भूखंड आहेत. या भूखंडांवर कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक देखील ‘सिडको'ने लावला होता. परंतु, मागील महिन्यात अचानकपणे या भूखंडावर भूमाफीयांची वक्रदृष्टी पडली अन् ‘सिडको'ने लावलेला फलक, तारेचे कुंपण रातोरात उखडून टाकण्यात आले. सदर भूखंडावर नवी मुंबई महापालिका किंवा सिडको प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्याकरिता पाया खोदायला सुरुवात करण्यात आली. सदर माहिती तुर्भे ग्रामस्थांना कळतात त्यांच्या मध्येही याविषयी जोरदार चर्चा चालू झाली. त्यानंतर नवी मुंबई महापालिका आणि सिडको अतिक्रमण विरोधी विभागाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. या तव्रÀारीची त्वरीत दखल घेऊन महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तेथे चालू बांधकामाचा पाया घालण्यासाठी खड्डे खोदण्याचे चालू असलेले बांधकाम थांबवण्यात आले. आता दिवाळीनंतर पुन्हा भूमाफीयांनी सदर बांधकाम जोरदारपणे चालू केले आहे. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी, तथाकथित समाजसेवक तसेच पोलीस, महापालिका आणि सिडको अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सदरचे भूखंड क्रमांक २९६ ए, २९६ बी, २९६ सी (अंदाजे क्षेत्रफळ ३०० चौ. मी.) भाजी मार्केट करिता उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी श्री मांढरदेवी काळुबाई सामाजिक सेवा संस्था यांच्या तर्फे ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.