महापालिकेचे ‘माझे शहर माझा अर्थसंकल्प' अभियान
आयुक्त नार्वेकर यांची लोकाभिमुख शहर विकास संकल्पना
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनेक नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. त्या गुणात्मकदृष्ट्या उत्तम राखण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. यामध्ये ज्यांच्यासाठी सुविधापूर्ती केली जाते, त्या नागरिकांचाही वैचारिक सहभाग असावा या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून ‘माझे शहर माझा अर्थसंकल्प' अभियान हाती घेतले जात आहे.
याद्वारे नवी मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्प निर्मितीत नागरिकांच्या सुचनांचा विचार केला जाणार असून नवी मुंबई शहरातील सुविधा वाढीमध्ये तसेच शहर विकासामध्ये ज्या बाबी नागरिकांना सुचवाव्याशा वाटतात, त्या प्रशासनापर्यंत सहजपणे पोहोचाव्यात. या माध्यमातून नवी मुंबई शहर राहण्यास अधिक दर्जेदार आणि सर्वेात्तम व्हावे अशी संकल्पना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्फत मांडण्यात आलेली आहे.
प्रत्येक नागरिकाला आपण राहत असलेल्या शहराविषयी अभिमान वाटत असतो. त्यात नवी मुंबईसारखे सर्वत्र नावाजले जाणारे शहर असेल तर अभिमान अधिकच दृढ असतो. त्यामुळे आपले शहर अधिक सुंदर-आधुनिक व्हावे या नागरिकांच्या मनातील इच्छेला ‘माझे शहर माझा अर्थसंकल्प' या अभियानाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने ‘माझे शहर, माझा अर्थसंकल्प' अंतर्गत नवी मुंबई शहराविषयी नागरिकांचे अभिप्राय, सूचना प्राप्त होण्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या ैैै.हस्स्म्.ुदन्.ग्ह या वेबसाईटवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यावर नागरिकांनी आपले अभिप्राय विभागनिहाय नोंदवायचे आहेत.
याशिवाय म्ीदिॅहस्स्म्.ुदन्.ग्ह या ई-मेलवर नागरिक पीडीएफ फाईल स्वरुपात आपले अभिप्राय, सूचना देऊ शकतात. याखेरीज लेखी स्वरुपात आपल्या सूचना, अभिप्राय द्यावयाचे असल्यास ते महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावरील टपाल कक्षात लिफापयावर ‘माझे शहर, माझा अर्थसंकल्प' आणि संबंधित विभागाचे नाव ठळकपणे नमूद करुन द्यावेत, असे सूचित करण्यात येत आहे.
नागरिकांनी आपले अभिप्राय, सूचना जास्तीत जास्त १ हजार शब्द मर्यादेत १५ डिसेंबर २०२३ पर्यंत सादर करावयाचे आहेत. यामध्ये नागरिकांनी आपले अभिप्राय विभागनिहाय सादर करावयाचे आहेत. तसेच आपल्या अभिप्रायाच्या अंमलबजावणीमुळे शहराच्या गुणवत्तेत विकासात्मक वाढ होण्यास किंवा शहर सर्वोत्तम होण्यास कशा प्रकारे हातभार लागेल, ते देखील स्पष्टपणे नमूद करणे अभिप्रेत आहे.
नागरिकांमार्फत प्राप्त सूचना, अभिप्रायांच्या अनुषंगाने संबंधित विभागामार्फत त्यांची पडताळणी करण्यात येऊन त्यामधील सर्वेात्तम सूचना, अभिप्राय यांचा समावेश आगामी अर्थसंकल्पात करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून अर्थसंकल्प अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची प्रशासनाची संकल्पना आहे. त्यामुळे सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवी मुंबई शहराला सर्वोत्तम बनविण्यासाठी आपले अभिप्राय आणि सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.