वाशी मधील निर्माणाधीन इमारतीत आग
बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
वाशी : वाशी सेक्टर-१४ येथील नवी मुंबई महापालिकेच्या निर्माणाधीन इमारतीत २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता आग लागल्याची घटना घडली. मात्र, नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा या इमारतीला खेटूनच असलेल्या पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती. मात्र, या घटनेमुळे या महापालिका इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाशी सेक्टर-१४ मधील भूखंड क्रमांक-४ आणि ५ येथे नवी मुंबई महापालिका तर्फे बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम २०११-१२ मध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र, या इमारतीचे स्लॅब आणि भीम मध्येच खचल्याने इमारतीचे बांधकाम थांबवण्यात आले. २०१६ साली सदर इमारत तोडून नवीन इमारत बांधण्याचे आणि दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश तात्कालिक महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिले होते. मात्र, माजी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्या आदेशानंतर ‘ना इमारत तोडण्यात आली ना ठेकेदारावर कारवाई' करण्यात आली. त्यामुळे बहुउद्देशीय इमारतीचे काम ‘जैसे थे वैसे'च राहिल्याने या इमारतीचा वापर काही अमासाजिक तत्वे करु लागली. त्याचाच प्रत्यय २ डिसेंबर रोजी आला. याठिकाणी तळ मजल्यावर असलेल्या कचऱ्याला आग लागून आगीने रौद्र रुप धारण केले होते. तर या इमारतीला खेटूनच पेट्रोल पंप आणि सीएनजी पंप आहे. त्यामुळे या आगीमुळे जर पेट्रोल पंपाने पेट घेतला असता तर आजुबाजुच्या रहिवासी इमारतींना देखील धोका निर्माण होऊन मोठी हानी झाली असती. मात्र, आगीची घटना समजताच आणि बाजूला पेट्रोल पंप असल्याचे लक्षात येताच वाशी अग्निशमन दलाने अधिक कुमक घटनास्थळी घेत आग विझवली. मात्र, या घटनेमुळे या इमारतीच्या बांधकामाबाबत शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, वाशी सेक्टर-१४ मधील निर्माणाधीन इमारतीला लागलेली आग येथील कचऱ्याने पेट घेतल्याने लागली असून, या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्र प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.