२८ व्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत सोहळ्यास आरंभ

पंडित राम मराठे यांचे संगीत सृष्टीला मोठे योगदान - पं. सुरेश तळवलकर

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारंभाला १ डिसेंबर रोजी ठाणेकर रसिकांच्या उदंड प्रतिसादात गडकरी रंगायतनमध्ये प्रारंभ झाला. ज्येष्ठ गायक डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी रंगमंचावर पं. सुरेश तळवलकर, निषाद बाक्रे, पं. संजय मराठे, ठाणे महापालिका परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिवत आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती-जनसंपर्क) उमेश बिरारी, आदि उपस्थित होते.
सदर सोहळ्यात पं. राम मराठे जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ तबला वादक, तालयोगी पंडीत सुरेश तळवलकर यांचा ठाणे महापालिका तर्फे सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ गायक डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना पं. राम मराठे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. रुपये ५१ हजार, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर पं. राम मराठे युवा पुरस्काराने गायक निषाद बाक्रे यांचा गौरव करण्यात आला. रुपये २५ हजार, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्याचबरोबर पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्यासह काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यापैकी पं. वासुदेव जोशी, पं. प्रदीप नाटेकर, पं. संजय मराठे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारला. तर विदुषी शुभदा दादरकर, पं. मधुबुवा जोशी, पं. वाय. टी. वैद्य आणि पं. विश्वनाथ कान्हेरे यांनाही सदर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पं. राम मराठे यांचे संगीत क्षेत्राला मोठे योगदान आहे. त्यांनी अफाट गायकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या नावाचा सन्मान मिळणे त्यांचा मिळालेला आशिर्वाद मानतो, असे प्रतिपादन पंडीत सुरेश तळवलकर यांनी यावेळी केले.

ठाणेकर रसिकांचे प्रेम भरभरुन मिळत असल्याने या शहरात कार्यक्रम सादर करताना नेहमीच आनंद होतो. आज मित्राचा सत्कार करण्यासाठी मी आवर्जुन आलो, असे डॉ. पं. अजय पोहनकर यांनी सांगितले.

राम मराठे यांचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता सुरु होऊन पहाटे पाचपर्यंत रंगत असे. त्यांच्याकडे अफाट ऊर्जा होती. विविध घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली होती. त्यांच्या नावाचे गुरुकुल ठाण्यात सुरु व्हावे, अशी अपेक्षा यावेळी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. तसेच साथसंगत करणारा कलाकार गाणे सादर करणारा कलाकार आणि रसिक यांचा मध्य असतो. तो प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा साक्षीदार असतो. तीच साक्ष जीवनात खूप शिकवत असते. त्यामुळे आम्ही समृध्द होत असतो, असेही तळवळकर म्हणाले.
अनेक वर्षे मी पं. राम मराठे यांना संगत केली आणि त्यांच्या नावाचा पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल ठाणे महापालिकेचे आभार मानतो. त्यांच्या नावाचा महोत्सव होतोय याचे मला समाधान आहे. राम भाऊंना मी जवळून पाहिले आहे. त्यांना ऐकताना १५ गवईंना एकत्र ऐकण्याचे समाधान मिळत असे. ते नट असल्याने उत्तम नकला करत. त्यांची नक्कल दर्जाची असे की, ती नकक्ल कधी गायकीत शिरायची ते कळायचे नाही. ऐकणारे रसिक पं. राम मराठे यांना ऐकत नसून तर त्या व्यक्तीला ऐकत असल्याची अनुभूती त्यांना येत. राम मराठे गायक, नट याचबरोबर तेवढ्याच तोलाचे तबला वादकही होते, असेही  पं. सुरेश तळवलकर म्हणाले.

तर शास्त्रीय संगीताचा प्रवास करताना सत्त्व परीक्षा घेतली जाते. या प्रवासादरम्यान एक व्यक्ती प्रवास करत असते. पण, त्या अवती-भवती अनेक लोक असतात. त्या एका व्यक्तीला आत्मविश्वास तर अवती-भवती असणाऱ्यांना विश्वास असतो. असा विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी केलेले कौतुक म्हणजे पुरस्कार आहे, असे निषाद बाक्रे म्हणाले. सदर सोहळ्यास पं. मुकुंद मराठे, भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे, आदि मराठे कुटुंबीय उपस्थित होते. महोत्सवाची पहिली प्रवेशिका घेणारे गानरसिक प्रकाश भालेराव यांचाही यावेळी अतिरिवत आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रास्ताविक केले. रोडे यांनी या महोत्सवाचे आयोजन, महापालिकेचे प्रयत्न, महोत्सवाचे स्वरुप याविषयी माहिती दिली. उपायुक्त उमेश बिरारी यांनी आभार प्रदर्शन केले. राजेंद्र पाटणकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाशी मधील निर्माणाधीन इमारतीत आग