परदेशी, स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन
खारघर खाडी किनाऱ्यावर ‘किलबिलाट' मध्ये वाढ
खारघर : खारघर मधील खाडी किनारी युरोप, रशिया आणि मध्य आशियामधून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले असून, खारघर मधील खाडी किनाऱ्यावर पक्ष्यांचा किलबिलाट वाढल्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. खारघर मधील खाडी किनारी ओरिएंटल डार्टर, साप पक्षी, काळ्या डोक्याचा शराटी, ब्लॅक टेलेड गॉडविट्स आदी पक्षी दाखल झाल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.
निसर्गरम्य परिसर, हिरवीगार वनराई आणि खारघर रेल्वे स्थानक पासून ते पेठगाव दरम्यान दूरवर पसरलेल्या खारघर मधील खाडी जलाशयात देश-विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी पक्षी प्रेमी गर्दी करीत आहेत. खारघर सेक्टर-१६ मधील वास्तुविहार आणि सेक्टर-२७, रांजणपाडा, मुर्बी गाव लगत असलेल्या खाडी किनाऱ्यावर युरोप, रशिया आणि मध्य आशिया देशातील पाहुणे या पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पक्ष्यांची खारघर मधील पक्षीतज्ज्ञ सारंग तरीण, ज्योती नाडकर्णी आणि इतर पक्षीप्रेमींनी पाहणी केली.
युरोप, रशिया आणि मध्य आशियामधून आलेल्या ब्लॅक टेलेड गॉडविट्स, ओरिएंटल डार्टर, साप पक्षी, कर्ल्यू सँडपायपर्स आणि पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर आदी पक्ष्यांसह आफ्रिका देशातील रोहित, सारस बगळे, रेड बुलबुल, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, चिमणी, घार, गरुड , किंगफिशर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताऱ्या, खंडया, बगळे, राखी बगळे, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे आदी देश-विदेशातील पक्ष्यांमुळे खारघर खाडी परिसर पक्षीमय झाल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून, खारघर खाडी किनाऱ्यावर युरोप, रशिया आणि मध्य आशियामधून स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. यामध्ये ब्लॅक टेलेड गॉडविट्स पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. - ज्योती नाडकर्णी, पर्यावरण प्रेमी - खारघर.
खारघर खाडीकिनारी ब्लॅक टेलेड गॉडविट्स, कर्ल्यू सँडपायपर्स, पॅसिफिक गोल्डन प्लोवर यांच्यासह अनेक विदेशी पक्षांची रेलचेल आहे. सँडपायपर्स पक्षी एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी आहे. ब्लॅक टेलेड गॉडविट्स पक्षाचा रंग काळसर, पाय लांब असून, त्यास लिमोसा या नावाने देखील ओळखले जाते. विशेष म्हणजे ब्लॅक टेलेड गॉडविट्स पक्षी भारत, बांगलादेश, युरोप, जपान, पाकिस्तान, सायबेरिया आदी देशात दिसून येतो. तर पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर पक्षी सागरकिनारी आढळणारा पक्षी असून तो सायबेरिया देशात दिसून येतो. इतरही देश-विदेशी पक्षी खारघर खाडीकिनारी आले असून, पक्षीप्रेमींनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पक्षीतज्ज्ञ सारंग तरीण यांनी केले आहे.