रेल्वे स्थानकांना गावांची नावे देण्याची मागणी

अन्यथा नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या उद्‌घाटनाला विरोध

उरण : लवकरच सुरु होणाऱ्या नेरुळ-उरण रेल्वे मार्गामधील नवघर, बोकडविरा, कोटगाव, धुतूम, जासई या गावांची नावे सिडको किंवा शासनाकडून संंबंधित रेल्वे स्टेशनना न दिल्यास येथील ग्रामस्थांकडून बहुप्रतिक्षीत उरण रेल्वे मार्गाच्या उद्‌घाटनाला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा सदर गांवच्या ग्रामस्थांनी ‘सिडको'ला दिला आहे.

उरण रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे कोणत्याही क्षणी उद्‌घाटन होणार असून या मार्गात असणाऱ्या नवघर, बोकडविरा, कोटगांव, धुतूम, जासई या गावांची नावे येथील रेल्वे स्थानकांना देण्याची आग्रही मागणी येथील ग्रामस्थांकडून सिडको आणि शासनाकडे करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने येथील ग्रामस्थांची ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय अधिकारी शांतनू गोयल यांच्या सोबत बैठक झाली.

बैठकीच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी आमच्या गावांची नावे रेल्वे स्थानकांना द्या, त्यानंतरच उरण रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन करा, असे स्पष्ट केले. तसेच रेल्वे स्थानकाशी संबंधित नोकरभरतीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणीही या ग्रामस्थ प्रतिनिधींनी यावेळी सह-व्यवस्थापकीय संचालक गोयल यांच्याकडे केली. त्यावर गोयल यांनी ग्रामस्थ प्रतिनिधींनी केलेल्या मागण्या ऐकून घेत रेल्वे स्थानकांना गावांची नावे देण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 सदर बैठकीस ‘बोकडविरा'च्या सरपंच अपर्णा मनोज पाटील, ‘जासई'चे सरपंच संतोष घरत, ‘नवघर'चे माजी उपसरपंच विश्वास तांडेल, ‘धुतूम'चे प्रेमनाथ ठाकूर, ‘उरण'चे निलेश भोईर यांच्यासह रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, भगवान पाटील, योगेश तांडेल, धीरज घरत, रुपाली खंडेश्वर पाटील, अवी म्हात्रे, यशवंत ठाकूर, नवले तांडेल, सुनील पाटील, नित्यानंद भोईर, प्रशांत पाटील आदि प्रमुख कार्यकर्त्यासह ५० हुन अधिक ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, सदर बैठकीमध्ये रेल्वे स्थानकांना संबंधित गावांच्या नावांचा अधिकार मिळेल, तसेच रेल्वे स्थानकांना नावे आल्याशिवाय उरण रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन रेंगाळणार, असे प्रा. एल. बी. पाटील यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला वागळे सर्कल येथे ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद