ठाणे मध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला सुरुवात

सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चा शुभारंभ २८ नोव्हेंबर रोजी ॲपलॅब चौक, मॉडेला मिल नाका येथील शिबिरात करण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण ७४ ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरचे दुसरे शिबीर साई हॉस्पिटल, शिवाजीनगर या भागात झाले.

शुभारंभाच्या कार्यक्रमात आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय वाघुले, विकास रेपाळे, सौ. नम्रता भोसले, तसेच सुजय पत्की, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदि सहभागी झाले. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरुप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत संकल्प यात्रा पोहोचवण्यासाठी सूचनाही दिल्या. मान्यवरांनी ‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या रथाची पाहणी केली. तत्पूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या हस्ते रथाचे उद्‌घाटन करण्यात आले.

याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या यात्रेचे उद्दीष्ट स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे असे यात्रेचे उद्दीष्ट असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. देशभरात असे रक्ष सर्वत्र जाणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ७४ ठिकाणी यात्रा जाईल. त्याची पूर्व तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू होती, असेही आयुवत बांगर यांनी सांगितले.

पीएम स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच पीएम ई-बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातूून फेब्रुवारी २०२४ पर्यंत १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आयुवत बांगर यांनी दिली.

‘स्वच्छ भारत अभियान'चा संदेश पोहोचवणे हाही या यात्रेचा उद्देश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही आहेत. रस्त्यावरील धूळ, कचरा, डेब्रिज याचा त्यांना पराकोटीचा तिटकारा आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी निर्देश देतात, असेही बांगर यांनी नमूद केले. या सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहनही बांगर यांनी केले.

पीएम स्वनिधी या योजनेतून कर्ज मिळालेल्या स्नेहा जाधव, संगीता गुरव, माणिकराव आठवले आणि खैरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात वाईट परिस्थिती असताना पीएम स्वनिधीतील कर्जाने खूप मोठा आधार दिला. सदर योजना ठाणे महापालिका मार्फत समजली आणि त्याची अमलबजावणीही वेगाने झाली, असे लाभार्थी म्हणाले. पीएम स्वनिधी योजना म्हणजे नवसंजीवनी योजना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकसित भारत संकल्पयात्रा वेळापत्रकः
३० नोव्हेंबर सकाळी १० ते दु. १.३० वागळे सर्कल
                   दु. २.३० ते सायं. ५.३०आशर आयटी पार्क
१ डिसेंबर  सकाळी १० ते दु. १.३० कशीश पार्क
                   दु. २.३० ते सायं. ५.३० मनोरुग्णालय चौक
२ डिसेंबर सकाळी १० ते दु. १.३० इटर्निटी मॉल चौक
                   दु. २.३० ते सायं. ५.३० बारा बंगला चौक
३ डिसेंबर  सकाळी १० ते दु. १.३० शिवमंदिर, कोपरी
                   दु. २.३० ते सायं. ५.३० ठाणे रेल्वे स्टेशन (पूर्व)
४ डिसेंबर  सकाळी १० ते दु. १.३० अष्टविनायक चौक, कोपरी
                   दु. २.३० ते सायं. ५.३० नारायण कोळी चौक, कोपरी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रेल्वे स्थानकांना गावांची नावे देण्याची मागणी